*रत्नागिरी, दि.9 :(जिमाका) – पंतप्रधान महोदयांनी जाहीर केल्याप्रमाणे स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत १३ ते १५ ऑगस्ट हे तीन दिवस घरोघरी तिरंगा फडकवतांना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरावयाची आवश्यकता नाही तसेच कार्यालयांना यासंबंधी ध्वजसंहिता पाळावी लागेल, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले आहे.*
हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा या कार्यक्रमांची अंमलबजावणी सर्व देशभर केली जात आहे. भारतीय जनतेमध्ये विशेषतः नवीन पिढीच्या युवकांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती जागृत व्हावी व राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त जनतेने सक्रीय सहभाग घ्यावा याकरीता अभियान राबविण्यात येत आहे.
या पर्वाचे औचित्य साधुन, स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती आपल्या मनात सदैव तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञात, अज्ञात नायक/क्रांतिकारक/विविध संघटना यांचे आपल्याला सदैव स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुलिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात विशेष करुन विदयार्थी व तरुणवर्गात राहावी, या उद्देशाने आपण सर्वजण प्रेरित होऊन, या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी 13 ऑगस्ट ते 15 ऑगसट 2024 या कालावधीत हर घर तिरंगा या उपक्रमाच्या यशस्वी व प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक रत्नागिरी वासियांनी आपल्या घरावर तसेच सर्व शासकीय/निमशासकीय/खाजगी आस्थापना/सहकारी संस्था/शैक्षणिक संस्था/गृहनिर्माण संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करुन उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सर्व रत्नागिरीवासीयांना केले आहे.
हर घर तिरंगा या कार्यक्रमांतर्गत तिरंगा यात्रा, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम (Concert), तिरंगा मानवंदना (Tribute), तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा दौड (Marathon), तिरंगा कॅनव्हास (Canvas), असे विविध कार्यक्रम 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात यावेत. तिरंगा झेंडयाचा आकार आयताकार असावा. तिरंगा झेंडयाची लांबी रुंदी प्रमाण हे ३:२ असे असावे. तिरंगा खादी अथवा कॉटन, पॉलिस्टर, सिल्क यापासून बनविलेला असावा. सर्व नागरिकांनी स्वतः तिरंगा ध्वज खरेदी करून आपल्या घरावर फडकविणे. सर्व नागरिकांनी उत्सफूर्तपणे हर घर तिरंगा उपक्रमात सहभागी होऊन सदर उपक्रम यशस्वी करावा. तसेच राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा. हर घर तिरंगा या कार्यक्रमाचे आपण स्वतः नागरिक, गृहनिर्माण संस्था, मंडळे, सहकारी संस्था यांनी राष्ट्रभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करावे. 13 ते 15 ऑगस्ट 2024 दरम्यान राष्ट्रध्वजासोबतचा सेल्फी www.harghartiranga.com वर अपलोड करावा, असेही जिल्हाधिकारी यांनी आदेशित केले आहे.