
सिंधुदुर्ग :सावंतवाडी, कणकवली येथील सभांमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या मुलांवर टीका केली होती. यापूर्वी सिंधुदूर्गकरांनी गुंडांना बाहेर केले होते, परंतू आता चूकून पुन्हा निवडून दिले आहे. आता मुलांना निवडून दिले तर बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर बसतील असे ठाकरे म्हणाले होते. यावरून नारायण राणे काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना राणेंनी यावर जाहीर सभेत बोलणार असल्याचे म्हटले आहे.
भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांची एकजूट हवी, असे काही अनुभव आलेत म्हणून हे सांगत आहे. या मतदारसंघातून मला ६ वेळा निवडून दिले. या भागासाठी अनेक कामे केली आहेत. काल उद्धव ठाकरे आले त्यावर जाहीर सभेत बोलेन. पण ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला मी काही बोलणार नाही, हे मी बाळासाहेबांना त्यावेळी वचन दिले होते, अशी आठवण राणे यांनी करून दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा समृद्ध होईल, त्यावेळी आनंद होईल. त्यावेळी सावंतवाडी ते पोलादपूर दरम्यान सर्व आमदार शिवसेनेचे आले म्हणून त्यावेळी कॅबिनेट मला मिळाले होते. आता आरोपांचा योग्य वेळी समाचार घेईन पण येथील तिन्ही जागा ताब्यात घ्या. विरोधकांना ५०-६० हजार मतांनी झोपवायचे आहे. या उद्धव ठाकरे यांनी एक तरी शाळा, हॉस्पिटल बांधले का? असा सवाल राणे यांनी केला.