*आमसभेच्या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत देवरूखात संगमेश्वर तालुक्याची आढावा बैठक उत्साहात संपन्न*
*देवरूख-* संगमेश्वर तालुक्याची आमसभा आमदार शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली १७ ऑगस्ट रोजी देवरूख येथील माटे-भोजने सभागृह येथे होणार आहे. आमदार शेखर निकम यांची ही पहिलीच आमसभा असल्याने या आमसभेच्या पार्श्वभूमीवर देवरुख पंचायत समितीच्या सभागृहात काल सोमवारी आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी बैठकीला तालुक्यातील शासकीय विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीनंतर आमदार शेखर निकम यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला.
दरम्यान, उपस्थित विविध विभागाचे कर्मचारी व आमदार निकम यांच्यामध्ये यावेळी तालुक्यातील नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. चार वर्षाने ही आमसभा होत असल्याने जनता, लोकप्रतिनिधी व विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यात प्रश्न-उत्तरांचा थेट आमनेसामना होणार असे सध्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे आमसभेपूर्वी जेवढे शक्य होतील तेवढे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना यावेळी आमदार निकम यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना या आढावा बैठकीत दिल्या आहेत. त्यानंतर आमदार निकम यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. त्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवून या समस्या लवकरात लवकर मार्गी लावाव्यात अशा सूचना केल्या. या पत्रकार परिषदेला आमदार निकम यांचेसह गटविकास अधिकारी भरत चौगले व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.