महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून रणनीती आखली जात आहे. अनेक पक्षांचे राजकीय दौरेही सुरु झाले आहेत. त्यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपाकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
*मुंबई :* भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं अखेर राज्यात विधानसभा निवडणुकीचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना देऊन पुन्हा त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. याबरोबरच राज्यातील एकूण २८८ जागांपैकी किमान १५० जागा भाजपाला सोडवून घेण्याची अटही पक्षाने देवेंद्र फडणवीस घातली असल्यानं देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही मोठी परीक्षा आहे. अशा परिस्थितीमध्ये आता राज्यात विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या जय-पराजय, यश-अपयशाचे धनी फडणवीस ठरणार आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत पुन्हा मुसंडी मारण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही आरपारची लढाई आहे.
*तूर्तास केंद्रीय जबाबदारीपासून दूर-*
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून सरकारमधून बाहेर पडत पक्ष संघटनेसाठी काम करण्याची विनंती देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केली होती. परंतु फडणवीस यांच्या मागणीकडं दुर्लक्ष करत केंद्रीय नेतृत्वानं पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी, सर्वाधिकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. फडणवीस यांना दिल्लीत पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष पद किंवा राष्ट्रीय पातळीवर एखादी जबाबदारी देण्यात येईल, अशा चर्चा काही दिवसापासून रंगल्या होत्या. परंतु या सर्व चर्चांना पूर्णविराम देत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
*लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकीतून बोध-*
लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार निवडीपासून जागा वाटपाचे सर्व निर्णय भाजपानं केंद्रीय पातळीवर घेतले होते. राज्यातील सुकाणू समितीनं सुचवलेल्या काही उमेदवारांची नावं नाकारून भाजपाने केलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार उमेदवार घोषित केले होते. परंतु याचा मोठा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला बसला. भाजपाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही आणि त्यांच्या केवळ ९ जागा निवडून आल्या. लोकसभा निवडणुकीत झालेली चूक पुन्हा होऊ नये म्हणून प्रदेश स्तरावर देवेंद्र फडणवीस यांनाच सर्वाधिकार देण्यात आले आहेत. उमेदवार निवडीपासून महायुतीत जागा वाटपाबाबत योग्य तो निर्णय आता देवेंद्र फडणवीस यांनाच घ्यावा लागणार आहे. निवडून येण्याची क्षमता या मुख्य निकषावर जागा वाटप केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीतील जागा वाटपावरुन अनेक ठिकाणी वाद झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्लीवारी करून भाजपाच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करावी लागली. यात बराच वेळ गेल्यानं अनेक मतदारसंघात उमेदवार घोषित करण्यास उशीर झाला. प्रचाराला फारसा अवधी न मिळाल्याकारणानं त्याचा फटका महायुतीला बसला. हे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मान्य केलं होतं. मात्र आता उमेदवार निवडीचे सर्वाधिकार आल्यानंतर त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करता येणार आहे.
*पहिली लढाई जगावाटपाची-*
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सर्वात मोठी कसोटी ही महायुतीत जागावाटपाची आहे. राज्यातील एकूण २८८ जागांपैकी १५० जागा भाजपाला सोडवून घेण्याची अट पक्षश्रेष्ठींनी फडणवीस यांच्यावर टाकली असल्याची सूत्रांची माहिती आहे. फडणवीस यांच्यावर दिल्लीहून काहीही लादलं जाणार नाही, असंही त्यांना सांगितलं. परंतु १५० जागा भाजपाने घेतल्यास मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री अजित दादा यांची १३८ जागांवर बोळवण करावी लागणार आहे. दोन्ही पक्ष त्यासाठी तयार होतील का? शिवसेना शिंदे गट विधानसभेसाठी कमीत कमी १०० जागांवर दावा करत आहे. अशात अजित दादा ३८ जागांवर कुठल्याही परिस्थितीत समझोता करणार नाहीत. म्हणूनच फडणवीस यांच्यासाठी जागा वाटपाचा पहिला टप्पा ही तारेवरची कसरत असणार आहे. त्यानंतर मतदारसंघाची आणि उमेदवारांची निवड याबाबतही महायुतीत बरीच रस्सीखेच होणार आहे. या सर्व परिस्थितीचा सामना फडणवीस यांना संयमाने करावा लागणार आहे. अर्थात त्यांच्यात हे चातुर्य असल्याकारणानं भाजपाच्या प्रक्षश्रेष्ठींनी सुद्धा विचार विनिमय करून फडणवीस यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.
*हा तर आमच्यासाठी शुभसंकेत – राऊत-*
फडणवीस यांच्याकडं विधानसभा निवडणुकीचे भाजपाने सर्वाधिकार दिल्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उबाठा) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले की, “जर का भाजपानं फडवणीस यांच्याकडं विधानसभा निवडणुकीचे सर्वाधिकार दिले असतील तर हा आमच्यासाठी मोठा शुभसंकेत आहे. तसेच या कारणामुळं आमच्या राज्यातील २५ जागा अधिक वाढतील.” राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पार्श्वभूमी पाहता. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोष आहे. मराठा आंदोलनाचा फटका लोकसभेत महायुतीला विशेष करून भाजपाला बसला होता. त्याच अनुषंगाने संजय राऊत हे फडणवीस यांच्याविषयी अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत. परंतु फडणवीस यांच्यासाठीही अस्तित्वाची लढाई असून विधानसभा निवडणुकीतील यश-अपयशाचे धनी अखेर फडणवीस ठरणार आहेत.
*देवेंद्र फडणवीस यांना सर्वाधिकार-*
या विषयावर बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आज महाराष्ट्रात नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस एक नंबरचे नेते आहेत. इतरही नेते आहेत परंतु, ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यापासून करत आहेत ते पाहता त्यांच्याकडं दूरदृष्टी असलेला नेता म्हणून पाहिलं जातं. राज्यात त्यांना पूर्वीपासून सर्वच अधिकार दिले आहेत. राज्यातील राजकारणात महत्त्वाचा निर्णय घेण्याचं काम देवेंद्र फडणवीस पूर्वीपासून करत आलेले आहेत. विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस निभावणार आहेत. मग ते जागावाटप असेल, मतदार संघाची निवड असेल किंवा उमेदवाराची निवड असेल, देवेंद्र फडणवीस यांना आता सर्वस्वी अधिकार आहेत.