
सांगोल्याहून मुंबईकडे जात बसला अपघात झाला. या अपघातात एकूण १४ जण जखमी झाले. ही घटना आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली.
रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर टेम्पोने बसला पाठीमागून धडक दिली. या धडकेनंतर बस २० फूट दरीस कोसळली. या अपघातात १४ प्रवासी जखमी झाले. जखमींना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी गर्दी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस सांगोल्याहून मुंबईला जात होती. दरम्यान, बस रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर पोहोचली असता पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने बसला जोरदार धडक दिली. या घडकेनंतर बस रेलिंगवर आदळली आणि दरीत कोसळली. या घटनेत बसमधील १४ जण जखमी झाले.जखमींना खोपोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे प्रथमोपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती महामार्ग सुरक्षा गस्ती पथकाने दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेक निकामी झाल्याने टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. या घटनेत टेम्पोमधील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पनवेलजवळील कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
*रस्ते अपघातात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर..*
देशात गेल्यावर्षी १ लाख ७० हजारांहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. तर, ४.६३ हजार लोक जखमी झाले आहेत. २०२२ च्या तुलनेत ही संख्या ४ टक्क्यांनी वाढली आहे. देशात दर तीन मिनिटाला एकाचा रस्ते अपघातात मृत्यू होत आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रासह एकूण २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये वाढ रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे, यात उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम आणि तेलंगणा यांसारख्या राज्याचा समावेश आहे.
*देशात सर्वाधिक अपघाती मृत्युंची नोंद कुठे?*
देशात सर्वाधिक अपघाती मृत्युंची नोंद तामिळनाडूत (१८ हजार ३४७) करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात २०२३ मध्ये १५ हजार ३६६ जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. तर, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये अनुक्रमे १३ हजार ७९८ आणि १२ हजार ३२१ हजार मृत्युची नोंद झाली. तामिळनाडूत जखमींची (७२ हजार २९२) संख्या मोठी आहे.