पहिल्या कसोटी सामन्यात नितीश कुमारने महत्त्वपूर्ण खेळी केली, ज्यामुळे भारताने १५० धावांचा टप्पा गाठला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात नितीश कुमारने आपल्या फलंदाजीने बरीच छाप पाडली. तसेच त्याने ऋषभ पंतसोबत ४८ धावांची भागीदारी केली. जी भारतीय डावातील सर्वात मोठी भागीदारी होती. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर नितीश रेड्डीने कबूल केले आहे की, पर्थमधील सामन्याबद्दल आपण थोडे तणावात होतो, मात्र प्रशिक्षक गौतम गंभीरच्या सल्ल्याचे पालन करून त्याची अस्वस्थता कमी झाली.
ऑप्टस स्टेडियमवर नितीशकुमार रेड्डीने ५९ चेंडूत ४१ धावांची दमदार खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताला १५० धावांपर्यंत मजल मारता आली. भारतीय संघाला पहिल्या डावात केवळ १५० धावा करता आल्या. ‘मी पर्थच्या विकेटबद्दल बरेच काही ऐकले होते. मी जरा नर्व्हस झालो होतो. पर्थच्या विकेटबाऊन्सबद्दल लोक खूप बोलायचे आणि ते माझ्या मनात होते. पण मग शेवटच्या सराव सत्रानंतर मला गौतम सरांशी झालेला संवाद आठवला.
पुढे तो म्हणाला की, ‘देशासाठी गोळी घेत आहात, त्याच पद्धतीने बाऊन्सरला सामोरे जावे लागेल’, असे ते म्हणत होते. प्रशिक्षकांच्या बोलण्याने मला प्रोत्साहन मिळाले. जेव्हा ते असे म्हणाले तेव्हा मला वाटले की मला देशासाठी बुलेट घेण्याची गरज आहे. गौतम सरांकडून मी ऐकलेली ही सर्वात चांगली गोष्ट आहे.’
पहिल्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला त्याला पदार्पणाबद्दल सांगण्यात आले होते, असे या २१ वर्षीय खेळाडूने सांगितले. ‘ आमच्या पदार्पणाबद्दल एक दिवस आधी कळले आणि आम्ही उत्साहित झालो. आम्ही शांत होतो आणि गेल्या आठवड्यात आम्ही ज्या रूटीनचे अनुसरण करत होतो त्याच रूटीनचे अनुसरण करत होतो. ’ आम्हाला जास्त दडपण घ्यायचे नव्हते. काल संध्याकाळी आम्हीही सायकल चालवली, त्यामुळे बरे वाटले, असे तो म्हणाला. आज सकाळी भारताचा स्टार फलंदाज आणि आदर्श विराट कोहलीने नितीशला ‘टेस्ट कॅप’ दिली तेव्हा त्याला सुखद धक्का बसला.