नांदेडमध्ये भाजपला बंडाचा इशारा:विधानसभेपूर्वी राजकीय समीकरणे बदलणार?, डॉ. मीनल खतगावकरांचे अपक्ष लढण्याचे संकेत…

Spread the love

*नांदेड-* राज्यात सध्या विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. आता लवकरच जागावाटपाची चर्चा राजकीय पक्षांमध्ये सुरू होईल. मात्र त्यापूर्वीच नांदेडमधून एक मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. नांदेडमध्ये भाजपला विधानसभेपूर्वीच बंडाचा इशारा देण्यात आला आहे. भाजप नेत्या डॉ. मीनल खतगावकर यांनी निवडणुकीपूर्वीच पक्षाकडून संधी न मिळाल्यास अपक्ष लढण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, त्यांनी काही महिन्यांपूर्वीच गृहमंत्री अमित शहा यांची भेटही घेतली होती.

*काय म्हणाल्या मीनल खतगावकर?..*

यावेळी बोलताना मीनल खतगावकर यांनी स्पष्टपणे बंडाचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे ही कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. भाजपने उमेदवारी दिली नाही तरी लढणार का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर त्या म्हणाल्या, दोन वेळा आम्हाला माघार घ्यावी लागली. 2019 आणि 2024 च्या लोकसभेत पक्षादेश आम्ही मान्य केला. परंतु आता जर पक्षाकडून संधी मिळाली नाही तर अपक्ष लढण्याची कार्यकर्त्यांची भूमिका आहे. आणि ती भूमिका मला मान्य आहे”, असे मीनल खतगावकर म्हणाल्या.

*अमित शहांची घेतली होती भेट-*

दरम्यान, मीनल खतगावकर यांनी गृहमंत्री अमित शहा यांची काही महिन्यांपूर्वी भेट घेतली होती. नांदेड लोकसभेसाठी मीनल खतगावकर इच्छा दाखवली होती. मीनल या माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सून आहेत. त्यांच्या या विधानामुळे आता नांदेडमध्ये राजकीय समीकरणे बदलणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता पक्षाकडून त्यांना उमेदवारी दिली जाते का, ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

*सध्या विद्यमान आमदार कोण?..*

नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातून डॉक्टर मीनल खतगावकर इच्छुक आहेत. नायगाव मध्ये भाजपचे विद्यमान आमदार राजेश पवार असून याच मतदारसंघातून त्या इच्छुक असल्याने भाजपकडून आता नक्की कोणाला संधी मिळते हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page