पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघानं कांस्यपदक सामन्यात स्पेनचा पराभव करत कांस्यपदकावर नाव कोरलं. या विजयासह भारतीय हॉकी संघानं पीआर श्रीजेशच्या कारकिर्दीला अनोखा निरोप दिला आहे.
*पॅरिस :* पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघानं कांस्यपदक सामन्यात स्पेनचा 2-1 नं पराभव करत कांस्यपदकावर नाव कोरलंय. पुरुष हॉकी संघानं हे सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवलं. टोकीयो 2020 ऑलिम्पिकमध्येही भारताच्या पुरुष हॉकी संघानं कांस्यपदक पटकावलं होतं. यासह भारतीय हॉकी संघानं 52 वर्षांनंतर सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलंय. भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंग यानं केलेले दोन गोल आणि पीआर श्रीजेशचा भक्कम बचाव या जोरावर भारतानं कांस्यपदकावर नाव कोरलं. या विजयासह भारतीय हॉकी संघानं पीआर श्रीजेशच्या कारकिर्दीला अनोखा निरोप दिला आहे. या विजयानंतर देशभरातून भारतीय हॉकी संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
*दोन्ही संघाचा आक्रमक खेळ-*
भारत आणि स्पेन यांच्यातील कांस्यपदकाची लढत रोमांचक झाली. भारत आणि स्पेन यांनी पहिल्या क्वार्टरमध्ये दमदार खेळ केला. यामुळं दोन्ही संघांना गोल करता आला नाही. भारताविरुद्ध दुसऱ्या क्वार्टरमध्ये स्पेननं पेनल्टी स्ट्रोकचा लाभ उठवत गोलं केला. मार्क मिरालेसनं स्पेनसाठी हा गोल केला. स्पेननं सामन्यात आघाडी घेतल्यानंतर भारतानं जोरदार कमबॅक केलं. भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंगनं पेनल्टी कॉर्नरवर गोल करत 1-1 अशी बरोबरी केली. पहिला क्वार्टर संपेपर्यंत भारतीय संघानं आक्रमक खेळ करत सामन्यात बरोबरी साधली होती.
*टोकीयोमध्येही जिंकलं होतं कांस्यपदक-*
हरमनप्रीत सिंगनं भारतासाठी पहिला गोल 30 व्या मिनिटाला केला. तर, दुसरा गोलही हरमनप्रीत सिंगनं 33 व्या मिनिटाला केला. यामुळं भारतानं सामन्यात 2-1 अशी आघाडी घेतली. हीच आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. भारतानं यापूर्वी स्पेन विरोधात झालेले दोन्ही सामने जिंकले होते. भारतानं टोकीयो ऑलिम्पिकमध्येही जर्मनीला पराभूत करत कांस्यपदकावर नाव कोरलं होतं. या ऑलिम्पिकमधील भारताचं हे चौथं कांस्यपदक आहे.
ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाचं हे 13वं पदक ठरलंय. भारतीय हॉकी संघानं आतापर्यंत 8 सुवर्णपदकं, 1 रौप्यपदक आणि 4 कांस्यपदकं जिंकली आहेत.