*देवरुख-* संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी-किरदाडी येथील लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आणि संस्थाध्यक्ष सुरेश कदम यांच्या सौजन्याने कार्तिकी एकादशी निमित्त वारकरी “भक्त सेवार्थ पंढरपूर यात्रेचे” आज करण्यात आले होते. या यात्रेचा शुभारंभ मराठा भवन, देवरुख येथे राजापूरचे आम. राजन साळवी. माजी आमदार सुभाष बने व निखिल सुरेश कदम यांचे उपस्थितीत श्रीफळ वाढवून संपन्न झाला. यानंतर देवरुख ते पंढरपूर अशा एकूण ११ बसेस वारकऱ्यांना घेवून रवाना झाल्या.
सुरेश कदम यांच्या निस्वार्थपणे सेवेमुळे आज तालुक्यातील वारकऱ्यांना विठ्ठलाच्या चरणी नेण्याचे पुण्यकर्म सुरेश कदम यांचे हातून होत आहे ते कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार माजी आमदार सुभाष बने यांनी केले.
सकाळी मराठा भवन येथे मुंबई येथील विश्वास चव्हाण प्रस्तुत “सुरेल सुस्वर अभंगनाद” हा कार्यक्रम पार पडला. सूर निरागस हो, सुंदर ते ध्यान, अबीर गुलाल, विठू माऊली तू अशा सुमधुर गीतांनी या परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. सामाजिक, कला व सांस्कृतिक क्षेत्रात सुरेश कदम यांचे काम खूप मोठे आहे, असे प्रतिपादन नेहा साळवी यांनी आपले मनोगत मांडताना केले.
सलग सहा वर्ष सुरेश कदम यांचे माध्यमातून आम्हा पांडुरंगाच्या भेटीसाठी व्याकुळ असलेल्या वारकऱ्यांना पंढरीच्या वारीतून घडवून आणत आहे, ही बाब कौतुकास्पद आहे असे समिधा करंडे यांनी सांगितले. लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्थेचे सहसचिव संतोष जाधव यांनी कदम यांच्या कार्याविषयी व आलेल्या अनुभवाचा आढावा घेतला. वारकऱ्यांना देखील विठ्ठलाच्या भेटीची आतुरता असते आणि ही भेट घडविणे म्हणजे मोठे पुण्यकर्म आहे. याची जाणीव म्हणून विविध गावातून आलेल्या वारकरी मंडळींनी आयोजक निखिल कदम व संस्था पदाधिकाऱ्याचा सन्मान केला.
या संपूर्ण कार्यक्रमाला आमदार राजन साळवी, माजी आमदार सुभाष बने यांचेसह प्रमुख बंड्या बोरुकर, दत्ताराम लिंगायत, कोसुंबचे राजेंद्र जाधव, सुबोध पेडणेकर, मुन्ना थरळ आदी मान्यवरांसह वारकरी मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महेंद्र नांदळजकर व सुनील करंडे यांनी केले.