राजापूरातील सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने पोलीस व महसूल प्रशासनाला निवेदन
घटनेचा तीव्र निषेध नोंदवत केली कारवाईची मागणी
राजापूरातील गो वंश वाहतुकीचा बंदोबस्त करण्याचीही केली मागणी
राजापूर (प्रतिनिधी): रत्नागिरी नजिक मिरजोळे एमआयडीसी येथे रस्त्यावर सापडलेल्या गो वंशाचे शीर प्रकरणाचे तीव्र पडसाद आता जिल्हयात उमटू लागले आहेत. या प्रकरणी राजापूरातील सकल हिंदु समाजाच्या वतीने या घटनेचा जाहिर निषेध करत या विरोधात दोषींवर कठोर कारवाई व्हावी, राजापूरातुन होणाऱ्या गो वंश वाहतुकीचा बंदोबस्त करावा अशी मागणी करत याबाबतचे एक निवेदन राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण व महसूल नायब तहसीलदार सौ. सायली गुरव यांना देण्यात आले.
राजापूरातील सकल हिंदु समाजाच्या वतीने याबाबत देण्यात येणारे हे शेवटचे निवेदन असून राजापूर तालुक्यात देखील अशा प्रकारे गो वंश वाहतुक करणारे दलाल असून त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी सकल हिंदु समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली. अन्यथा या विरोधात रस्त्यावर उतरून कायदा हातात घेऊ असा ईशाराही सकल हिंदु समाजाच्या वतीने देण्यात आला.
रत्नागिरी नजीकच्या मिरजोळे एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक 44 वर गुरुवारी संध्याकाळी गोवंशाचे एक मुंडके रस्त्यावर पडलेले दिसून आले. त्यानंतर रत्नागिरीतील हिंदू बांधव आक्रमक झाले. दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि हे प्रकार तात्काळ बंद झाले पाहिजेत अशी मागणी करत शुक्रवारी पहाटेपर्यंत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजारो रत्नागिरीकर एकत्र आले होते. या सगळ्या प्रकारची दखल आता भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनीही घेतली आहे. या विरोधात ४८ तासात संबधीत आरोपीं विरोधात पोलीसांनी कारवाई करावी अशी मागणी करत हा सगळा प्रकार थांबला पाहिजे नाहीतर गो रक्षणासाठी कायदा हातात घ्यायला मागे पुढे पाहणार नाही असा इशाराही राणे यांनी दिला आहे.
या घटनेचे पडसाद आता जिल्हाभरात उमटत आहेत. राजापूरातही सकल हिंदू समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला व याबाबत पोलीसांना निवेदन देण्यात आले. रत्नागिरी येथे घडलेल्या गो तस्करी आणि गोहत्या या वारंवार आणि राजरोसपणे घडणाऱ्या प्रकारांवर तात्काळ कारवाई करुन सदर गो तस्करांना कठोर शिक्षा व्हावी आणि त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे. तर राजापूर तालुक्यातही छुप्या पध्दतीने गो वंश वाहतुक होत असून त्याला पायबंद घालावा अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर प्रकार हा आम्हा हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावणारा असून भूतदयेच्या दृष्टीनेसुध्दा अत्यंत क्लेशकारक आहे. सदरहू गोतस्करी आणि गोहत्या कोण करतो, कुठे करतो या सारख्या अन्य गोष्टीही प्रशासनास माहिती असल्याचे आमचे मत झाले आहे. राजापूर तालुक्यात सुध्दा असे प्रकार गोरक्षकांकडून अनेक वेळा उघडकीस आणले गेले आहेत.
त्यासंबधीच्या तक्रारी सुध्दा पोलिस ठाणे राजापूर येथे दिलेल्या आहेत. परंतू अद्यापही सदर गोतस्करांविरुध्द कोणतीही कठोर आणि ठोस कारवाई प्रशासनाकडून केली गेलेली नाही. गो तस्करी आणि गो हत्त्या या विषयात आम्ही सकल हिंदू समाज आपणाला हे अखेरचे निवेदन देत आहोत. यानंतरही सदरहू वेकायदेशीर व्यवसाय करणा-यांकडून हा व्यवसाय सुरु राहीला आणि प्रशासनाने त्यांचेवर कोणतीही कठोर कारवाई केली नाही व त्याचा परिणाम म्हणून हिंदू समाजाने आक्रमक होत कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्या परिस्थितीला सर्वस्वी संबंधित प्रशासन जबाबदार राहील असा ईशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावर पोलीसांकडून कठोर कारवाई केली जाईल असे सांगतानाच यासाठी पोलीस गस्त तसेच तपासणी नाके अधिक सतर्क असल्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी सांगितले. तर अशा प्रकारे कुठे काही आढळून् आले तर तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहनही चव्हाण यांनी केले आहे. तर महसूल नायब तहसीलदार सौ. सायली गुरव यांनी याबाबत पोलीस प्रशासनाला कारवाई करण्याबाबत आदेश दिले जातील व आपल्या भावना शासनपर्यंत पोहचवू अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, भाजपा प्रदेश ओबीसी सेलचे सचिव अनिलकुमार करंगुटकर, भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश गुरव, शिवसेना तालुका प्रमुख दीपक नागले, भरत लाड, नाना कोरगावकर, नागेश शेट्ये, अद्वैत अभ्यंकर, सुरज पेडणेकर, विवेक गुरव, विवेक गादीकर, डॉ. शेखर पाध्ये, दिलीप गोखले, देवेंद्र शेट्ये, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अरवींद लांजेकर, अमोल सिनकर, विनायक कदम, अमर वारीसे, आशिष मालवणकर, उमेश कोळवणकर, किरण शिवलकर, बाळ दाते, संदेश टीळेकर, राजा काजवे, अनंत रानडे, सुनिल पटेल, भाजपा महिला आघाडीच्या सौ. श्रृती ताम्हनकर, सौ. शीतल पटेल, सौ. माधवी हर्डीकर, चंद्रकांत जानस्कर, चिन्मय देवस्थळी, महेश चापडे, मंगेश कुरतडकर, विपुल वायकुळ, दिपक चव्हाण, अमोल सोगम, सदाशिव तांबडे, निलेश पांचाळ, प्रविण बाकाळकर, शैलेश आंबेकर, किरण तुळसवडेकर, अनिल नार्वेकर, नारायण ठाकूर, माधवन सुर्वे, संदीप बांधकर, विजय सप्रे, सुप्रिया कुर्ले आदींसह राजापूर शहर व तालुका परिरसरातील सर्व पक्षातील पदाधिकारी व सकल हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.