भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील दुसरा सामना हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे इथं झाला. या सामन्यात भारतीय संघानं शानदार खेळ करत यजमान झिम्बाब्वेचा 100 धावांनी पराभव केला. यासह त्यांनी मालिकेत 1-1 नं बरोबरी केली.
*हरारे :* भारतीय क्रिकेट संघ आणि झिम्बाब्वे यांच्यात 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील दुसरा सामना आज झाला. हा सामना हरारे स्पोर्ट्स क्लब स्टेडियमवर पार पजला. ज्यात भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेला जिंकण्यासाठी 235 धावांचं लक्ष्य दिलं होतं. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा डाव 134 धावांपर्यंत मर्यादित राहिला. भारतानं या सामन्यात 100 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-1 नं बरोबरी केली. आता मालिकेतील तीसरा सामना 10 जुलै राजी याच मैदानावर होणार आहे.
*भारतीय गोलंदाजांसमोर झिम्बाब्वेचे फलंदाज अडखळले :*
झिम्बाब्वेकडून वेस्ली माधवेरेनं सर्वाधिक 43 धावा केल्या. तर ब्रायन बेनेटनं 9 चेंडूत 26 धावा केल्या. अखेरीस ल्यूक जोंगवेनं 33 धावा केल्या. मात्र, हा सामना कोणत्याही फलंदाजाला जिंकवून देता आला नाही. फलंदाजांच्या पाठोपाठ भारतीय गोलंदाजांनी धुमाकूळ घातला आणि झिम्बाब्वेचा पराभव केला. भारताकडून वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि आवेश खान यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. या सामन्यात फिरकीपटूंनीही आपलं कौशल्य दाखवले. रवी बिश्नोईनं 2 बळी घेतले. त्याच्याशिवाय वॉशिंग्टन सुंदरला 1 विकेट मिळाली.
*अभिषेकचं आक्रमक अर्धशतक :*
या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 234 धावा केल्या. डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्मानं भारतीय संघासाठी झंझावाती शतक झळकावलं. अभिषेकनं आपला दुसरा सामना खेळताना केवळ 47 चेंडूत 100 धावांची खेळी केली, ज्यात सात चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता. अभिषेकनं वेलिंग्टन मसाकादजाविरुद्ध लागोपाठ तीन षटकार मारुन शतक पूर्ण केलं. मात्र, वेलिंग्टन मसाकादझाच्या पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. अभिषेकशिवाय ऋतुराज गायकवाड आणि रिंकू सिंग यांनीही तुफानी खेळी खेळली. ऋतुराजनं 47 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 77 धावा केल्या. रिंकूनं 22 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या. रिंकूच्या खेळीत पाच षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. ऋतुराज आणि रिंकू यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 36 चेंडूत 87 धावांची नाबाद भागीदारी झाली.
*टी 20 मध्ये भारतासाठी सर्वात जलद शतक (चेंडूंच्या बाबतीत) :*
35 – रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका, इंदूर 2017
45 – सूर्यकुमार यादव विरुद्ध श्रीलंका, राजकोट 2023
46 – केएल राहुल विरुद्ध वेस्ट इंडिज, लॉडरहिल 2016
46 – अभिषेक शर्मा विरुद्ध झिम्बाब्वे, हरारे 2024*
*टी 20 मध्ये भारतासाठी शतक ठोकण्यासाठी घेतलेले सर्वात कमी डाव :*
2 – अभिषेक शर्मा*
3 – दीपक हुडा
4 – केएल राहुल
*टी 20 मध्ये शतक झळकावणारे सर्वात तरुण भारतीय :*
21 वर्षे 279 दिवस – यशस्वी जैस्वाल विरुद्ध नेपाळ, 2023
23 वर्षे 146 दिवस – शुभमन गिल विरुद्ध न्यूझीलंड, 2023
23 वर्षे 156 दिवस – सुरेश रैना विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2010
23 वर्षे 307 दिवस – अभिषेक शर्मा विरुद्ध झिम्बाब्वे, 2024
*दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन :*
*भारतीय संघ :* शुभमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार
*झिम्बाब्वे संघ :* वेस्ली माधवेरे, इनोसंट कैया, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डिऑन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (यष्टीरक्षक), वेलिंग्टन मसाकादझा, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुझाराबानी आणि तेंडाई चतारा.