ठाणे : निलेश घाग राज्य सरकारने दिलेल्या ६०५ कोटी रुपयांच्या निधीतून हाती घेण्यात आलेल्या २८२ रस्त्यांची कामे पावसाळ्याच्या कालावधी थांबविण्यात आली होती. पावसाळा संपताच हि कामे पुन्हा हाती घेण्यात आली आहेत. येत्या १५ डिसेंबरपर्यंत ही कामे पुर्ण करण्याचे आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच रस्त्यांची जी कामे प्रलंबित राहतील त्याबद्दल जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही दिला आहे
जी कामे अपूर्ण आहेत, ती महिन्याभरात आणि जी कामे नव्याने सुरू करायची आहेत, ती दोन महिन्यात पूर्ण करण्याचे बंधन सर्व कार्यकारी अभियंता यांच्यावर असेल. सर्व अपूर्ण आणि नवीन कामाची यादी करून त्यांची कालमर्यादा आखून घ्यावी. त्यात, प्रलंबित कामांसाठी, भूसंपादन करण्याचा विषय वगळता कोणताही अपवाद केला जाणार नाही. काही कामे शक्य नसतील तर त्याची सयुक्तिक कारणमीमांसा सादर करावी. तशा कामांबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी मंजूर करताना गुणवत्तापूर्ण कामे आणि कालमर्यादा याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे या प्रकल्पातील कामे सुरू आहेत, असे होता कामा नये. कमीत कमी कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अभियंत्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आयुक्त बांगर म्हणाले. कार्यकारी अभियंत्यांनी पुढाकार घेऊन कामांना गती द्यावी. जिथे काही अडचणी येतील, त्यावर पर्याय शोधावा. तरीही मार्ग निघाला नाही तर वरिष्ठांशी बोलून मार्ग काढून घ्या. कोणत्याही स्थितीत १५ डिसेंबरनंतर ही कामे प्रलंबित राहू नयेत, असेही त्यांनी सांगितले
पावसाळ्यापूर्वी सुरू किंवा पूर्ण करण्यात आलेल्या कामाच्या व्यतिरिक्त इतर काही रस्त्यांची पावसाळ्यात दुरुस्ती करावी लागली असेल तर अशा रस्त्यांची प्रभाग समिती निहाय माहिती सादर करावी. त्यात, रस्त्यांची नावे, लांबी, मालकी, दोष दायित्व कालावधी अशी माहिती द्यावी. त्यातून त्या रस्त्यांचे पुढील पावसाळ्यापूर्वी नियोजन करणे शक्य होईल, असेही आयुक्त बांगर यांनी सांगितले.
जाहिरात