*नागपूर-* बांगलादेशमधील हिंदुंना टारगेट केले जात आहे. तेथील हिंदुंच्या घरादारांना आग लावून त्यांना हुसकावून लावल्या जात आहे. केंद्र सरकारने तेथील हिंदुंचे संरक्षण करावे अशी मागणी संघ आणि विहिंपने केली आहे.
बांगलादेश एक वेगळा देश आहे. तेथील हिंदुंची घरेदारे लुटली जात आहे. तेथे हिंदु सुरक्षित राहिल यासाठी केंद्राने पावले उचलावीत असे रा. स्व. संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांनी येथे सांगितले. केंद्र सरकारला आम्ही विनंती केली आहे. नक्कीच सरकार तेथील हिंदुंच्या सुरक्षेसाठी पावले उचलेल असे ते म्हणाले.
विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील आलोक कुमार यांनी बांगलादेशमध्ये हिंदुंचे संरक्षण व्हावे अशी मागणी केली आहे. बांगलादेशात हिंदूंची घरे, दुकाने, कार्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठाने, महिला, मुले आणि अगदी मंदिरे आणि गुरुद्वारा, त्यांची श्रद्धा केंद्रेही सुरक्षित नाहीत, असेही आलोक कुमार म्हणाले. तिथल्या अत्याचारित अल्पसंख्याकांची स्थिती वाईटाकडून वाईट होत चालली आहे, केंद्राने याची दखल घेत कारवाई करावी. बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी भारत सरकारने शक्य ती सर्व पावले उचलावीत, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले आहे.
या परिस्थितीचा फायदा घेत सीमेपलीकडून घुसखोरीचा मोठा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. याबाबत सावध राहावे लागेल. त्यामुळे आपल्या सुरक्षा दलांनी सीमेवर कडक नजर ठेवणे आणि कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ न देणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.