संगमेश्वर- मुंबई- गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या अनेक ठिकाणी संगमेश्वर तालुक्यात सुरू आहे हे काम करत असताना काही ठिकाणी पर्यायी मार्ग काढण्यात आला आहे मात्र या पर्यायी मार्गांवर भल्या मोठ्या खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी वाहन चालकांची या मार्गावरून प्रवास करताना मोठी डोकेदुखी होत आहे .या बाबींकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे.
चौपदरीकरण करत असताना पूर्वीचा डांबरीकरणाचा असलेला मुख्य रस्ता आता खोदण्यात आला आहे. आणि अशा ठिकाणी पर्यायी मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. काही ठिकाणी या पर्यायी मार्गांवर तात्पुरती डांबराची मलमपट्टी करण्यात आली होती. पावसाळ्यात हे पर्यायी मार्ग वापरावे लागत असल्याने तर या खड्ड्याचे साम्राज्य असलेल्या पर्यायी मार्गावर तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी सध्या जोर धरत आहे. आणि याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन ठेकेदार कंपनीला तशा सूचना देणे गरजेचे आहे.
रस्त्यालगत संरक्षण भिंत घालताना बाजूचा रस्ता खडून किंवा रस्त्यावर माती बॅरिकेट्स टाकल्यामुळे हे रस्ते सध्या प्रवासाला अगदीच निमुळते होत आहेत. किमान दोन वाहने जाऊ शकतील असा मार्ग असणे गरजेचे आहे. मात्र वस्तुस्थिती तशी दिसत नाही. विकासाला कोणाचा विरोध नाही मात्र किती दिवस खड्ड्यातून प्रवास करायचा असा प्रश्न समस्त वाहनचालकांसह तालुका वासीयांना पडत आहे.
ज्या ठिकाणी नव्याने तयार केलेला मार्ग वाहतुकीला खुले होणार नाहीत व पर्यायी मार्गाचा अवलंब पावसाळ्यात देखील करावा लागणार आहे, अशा पर्यायी मार्गांवर तात्काळ डांबरीकरण होऊन हे रस्ते खड्डेमुक्त व सुरळीत व्हावे अशी नाममात्र इच्छा तालुकावासियांची आहे. काही ठिकाणी पुलाचे बांधकाम चालू असताना त्या ठिकाणी देखील योग्य ती काळजी घेऊन संरक्षक बाबींची निर्मिती करणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा अपघाताला निमंत्रण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या पैसा फंड हायस्कूल समोरील रस्त्यावर ब्रिजचे काम सुरू असल्याने या ठिकाणी पर्यायी मार्ग करण्यात आला आहे.
या ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य आहे अशा अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य असल्याचे तालुक्यातील कामकाजावर लक्ष टाकल्यानंतर दिसुन येते. तर काही ठिकाणी मोर्यांची कामे झाली आहे तेथे काँक्रिटीकरण झालेले नाही अशा ठिकाणी देखील धक्के खात प्रवास करावा लागत आहे या साऱ्याचा विचार करून आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ डांबरीकरण व्हावे व किमान प्रवाशांना जाता येईल एवढ्या तरी सुविधा मिळाव्यात अशी माफक अपेक्षा तालुकावासीयां कडून होत आहे.