ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी नारळ आणि शेण फेकलं होतं. यामध्ये ताफ्यातील अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी प्रतिक्रिया दिली.
मुंबई : ठाण्यात शनिवारी रात्री उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला झाला. मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यावर शेण, टोमॅटो, बांगड्या आणि नारळ फेकले. याप्रकरणी 20 हून अधिक जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. शुक्रवारी बीड जिल्ह्यात राज ठाकरेंच्या ताफ्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या होत्या. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले.
बीडच्या क्रियेला प्रतिक्रिया-
शनिवारी रात्री ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेण आणि टोमॅटो फेकण्यात आले. “हा प्रकार म्हणजे ठाकरे गटाकडून बीड येथे करण्यात आलेल्या क्रियेला मनसेने दिलेली प्रतिक्रिया आहे,” असं म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर टीका केली. देशपांडे यांनी आज मुंबईतील आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
आम्ही संजय राऊत यांच्यासारखे पळकुटे नाही-
“सर्व महाराष्ट्र सैनिकांचे मनापासून अभिनंदन. आम्ही संजय राऊत यांच्यासारखे पळकुटे नाहीत. जे आम्ही केलं ते आम्हीच केलं. जे आमच्या लोकांनी केलं ते आमच्याच लोकांनी केलं. दुसऱ्यांवर आरोप लावण्याची आम्हाला गरज नाही,” असं म्हणत संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांवर टीका केली.
तुम्ही आरे केलं तर आम्ही कारे करणार-
राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर, हेच का तुमचे बाळासाहेबांचे विचार, असा सवाल सध्या ठाकरे गटातील नेत्यांकडून मनसेला विचारला जात आहे. यावर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, “आम्हाला पण बाळासाहेबांची संस्कृती आहे. तुम्ही जर शिवसैनिक असाल तर लक्षात ठेवा आम्ही देखील महाराष्ट्र सैनिक आहोत. तुमच्याकडं जसं बाळासाहेबांचे विचार आहेत तसे आमच्याकडे देखील बाळासाहेबांचे विचार आहेत. तुम्ही आरे केलं तर आम्ही कारे करणार. तुम्ही नीट राहिलात तर आम्ही नीट राहू.”
….तर महाराष्ट्रात काय परिस्थिती निर्माण होईल?…
ॲक्शनला रिएक्शन ही मिळतच असते, असं म्हणत ठाण्यातील प्रकाराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. यावर बोलताना देशपांडे म्हणाले की, “जो काही प्रकार घडला तो संपूर्ण महाराष्ट्राने बघितला आणि तो कोणालाही आवडलेला नाही. आपणही लोकांमध्ये सहभाग घेतो, लोकांमध्ये जातो, दौरे करतो, त्यामुळं जर प्रत्येकाने असं ठरवलं तर महाराष्ट्रात काय परिस्थिती निर्माण होईल याचा विचार करायला पाहिजे.”
दुसऱ्यानां शहाणपण शिकवायचं बंद करा-
उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी नारळ फेकले. हे नारळ एखाद्याला लागून गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती. जर एखाद्या दुखापत झाली असती तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून विचारला जात आहे. त्याला उत्तर देताना देशपांडे म्हणाले की, “आपण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो तेव्हा सर्व बाबींचा विचार करूनच सुरु करायचं असतं. आपण विचार करायचा नाही आणि दुसऱ्याने काही केलं तर त्याला शहाणपण शिकवायचा हे बंद झालं पाहिजे.”