आमदार सुरेश धस यांची तक्रार करण्यासाठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
*मुंबई /प्रतिनिधी-* अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने आज (दि.29) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांची प्राजक्ताने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे तक्रार केली आहे. दरम्यान, पुढील काळात सुरेश धस यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. याबाबत प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देखील दिले आहे.
दरम्यान, आता बीडमधील संतोष देशमुख प्रकरण आता वेगळ्या वळणार जात आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय. एकूण आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याकडून महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. आता प्राजक्ताने कुटुंबियांसमवेत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
प्राजक्ता माळीने भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल. त्यांच्याविरोधात यूट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात, अशीही तक्रार त्यांनी यावेळी केली. त्या सर्वांवर सुद्धा कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिले.
चंद्रकांत पाटील यांच्या सुरेश धसांना कानपिचक्या…
भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना अभिनेत्री रश्मिका मांदना, प्राजक्ता माळी आणि सपना चौधरी या कलाकारांची नावं घेतली होती. त्यानंतर भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांकडून सुरेश धस यांना कानपिचक्या मिळत आहेत. शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवावा. कोणत्याही महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असा सल्ला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुरेश धस यांना दिलाय.
शासनाकडून कठोर कारवाई करणे बाबत आयोग पुढाकार घेईल : रुपाली चाकणकर …
अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची तक्रार आयोग कार्यालयास प्राप्त झाली आहे. त्याचा अभ्यास करून, कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार आयोग करेल. महिलांबाबत समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान ठेवलं पाहिजे,कारण संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे सर्व क्षेत्रांमध्ये महिला स्वतःच्या कर्तुत्वावर काम करत आहेत आणि काम करत असताना समाज माध्यमांद्वारे केवळ त्या महिला आहेत म्हणून कोणताही पुरावा नसताना माध्यमांमध्ये त्यांच्या बाबतीत बदनामी करणारे वक्तव्य व त्याआधारे समाज माध्यमात सर्व घटकांनी शहानिशा न करता अतिशय घाणेरड्या पद्धतीने ट्रोल करणे याबाबत शासनाकडून कठोर कारवाई करणे बाबत आयोग पुढाकार घेईल, असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या.