नागपूर : रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखनिवासी मदन वामनराव मोडक व सौ. मंजिरी मदन मोडक यांनी रविवारी नागपूर येथे वनवासी कल्याण आश्रमासाठी एक कोटी अकरा लाख रुपये देणगीचा धनादेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांच्या हाती सुपूर्द केला.
कल्याण आश्रमाचे अध्यक्ष माननीय सत्येंद्र सिंह याप्रसंगी उपस्थित होते. श्री. मोडक यांच्या दोन्ही कन्या सपरिवार कार्यक्रमात उपस्थित होत्या.
वनवासी कल्याण आश्रम देशभरातील वनवासी समाजाच्या विकासासाठी कार्यरत सेवा संस्था आहे. कल्याण आश्रम देशभरात विद्यालय, एकल विद्यालय, आश्रमशाळा चालवित आहे. या प्रकल्पामध्ये एक लाखपेक्षा अधिक विद्यार्थी शिकत आहेत. संस्थेव्दारा रुग्णालय, आरोग्य केंद्र, आरोग्य शिबिर, ग्राम आरोग्य रक्षक योजना व्दारे लाखो रुग्णांची सेवा केली जाते. या सामाजिक कार्याला श्री. मोडक यांनी देणगी दिली आहे.
मदन मोडक हे देवरुख येथील प्रतिष्ठित बागायतदार व सामाजिक कार्यकर्ते आहेत. श्री. मोडक हे श्री स्वामी समर्थ सेवक प्रतिष्ठान, देवरुख शिक्षक प्रसारण मंडळ, कोकण मराठी साहित्य परिषद अशा विविध संस्थामध्ये सक्रिय आहेत. त्यांनी उभारलेल्या शहीद जवान स्मारक प्रकल्पाची दखल पंतप्रधान मोदी यांनी घेतली होती. अशा सेवाभावी मोडक यांनी स्वत: कल्याण आश्रम कामाची माहिती घेऊन एक कोटी अकरा लाख रु. देणगी दिली आहे.
आपले मनोगत व्यक्त करताना श्री. मोडक म्हणाले की, “माझे वडील भारतीय सेनेत होते, त्यांच्याकडून मिळालेल्या संस्कारातून मला ही सेवेची प्रेरणा मिळाली. सामाजिक बांधिलकीतून मी ही मदत करत आहे.”
कल्याण आश्रमाचे अध्यक्ष सत्येंद्र सिंह यांनी आपल्या भाषणात भामाशाह याने जशी राणा प्रताप यांना मदत केली तसे आज सामाजिक कार्यासाठी भामाशाह आवश्यक आहेत. या प्रसंगी मोडक परिवाराला कल्याण आश्रमाच्या वतीने धन्यवाद दिले. आजच्या कार्यक्रमाला कल्याण आश्रम विदर्भ अध्यक्ष निलिमाताई पट्टे, संघटन मंत्री अतुल जोग, युवा प्रमुख वैभव सुरंगे, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते.