*मुंबई-* अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. शनिवार (दि.12) सायंकाळी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या छातीवर गोळ्या लागल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची आता कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गॅंगने जबाबदारी घेतली आहे. यामध्ये बॉलीवूड आणि सलमान खान कनेक्शन असल्यामुळे लॉरेन्स बिश्नोई गॅंगने बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्याचे काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे. या प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांसह अभिनेता सलमान खान यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांना यापूर्वी देखील जीवे मारण्याची धमकी आली होती. यानंतर त्यांना Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. तरी देखील बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर प्रमुख नेत्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. बाबा सिद्धीकी यांच्यावर झालेल्या हल्यानंतर मलबार हिल परिसरातील मंत्र्याच्या बंगल्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मलबार हिल परिसरातील इतर मंत्र्याच्या बंगल्याबाहेरही पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मलबार हिल परिसरातील अतिमहत्वाच्या पाँईंटवर नाकाबंदी करण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
याचबरोबर या प्रकरणानंतर सलमान खान याच्या घराच्या सुरक्षेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. काही महिन्यापूर्वी लॉरेन्स बिश्नोई गॅंगने सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडल्या होत्या. यातील आरोपीचा पोलीस कोठडीत त्याचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू त्यांचा बदला असल्याचे टोळीचे म्हणणे आहे. यानंतर सलमान खानच्या जीवाला लॉरेन्स बिश्नोई याच्याकडून धोका असल्याचे देखील अनेकदा समोर आले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता सलमान खानच्या घराची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. अभिनेता सलमान खानला पोलिसांनी रुग्णालयात येण्यापासून मनाई केली आहे. त्याला घरीच राहण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सलमान खाननं त्याचं बिग बॉस 18 शोचं शूटिंगही थांबवलं आहे. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर भाईजान तात्काळ रुग्णालयात पोहोचला होता. त्यानंतर त्याला घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.