*रत्नागिरी :- शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेतल्यास प्रत्येकाची आर्थिक सुलभता होईल. शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.*
कामगार विभाग आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई (जिल्हा रत्नागिरी) यांच्यावतीने रत्नागिरी तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना आज पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते अत्यावश्यक संच, सुरक्षा संच व गृहोपयोगी वस्तू वाटपाचा कार्यक्रम देसाई बॅंक्वेट येथे झाला. सहाय्यक आयुक्त कामगार संदेश आयरे, माजी नगराध्यक्ष राहूल पंडित, माजी सभापती दिलीप सावंत, तहसिलदार राजाराम म्हात्रे, बिपीन बंदरकर, विनोद कदम, सुशांत जाधव, संजय जाधव, दिव्या गोताड आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले, माझी लाडकी बहीण, लेक लाडकी यासारख्या योजना शासनाकडून राबविण्यात येत आहेत. त्याचबरोबर कामगार विभागांच्या २१ योजनांपैकी अत्यावश्यक संच, सुरक्षा संच व गृहोपयोगी वस्तू वाटप ही एक योजना आहे. यामाध्यमातून एका नोंदीत कामगारांच्या घरात २० हजार रुपयांच्या गृहोपयोगी वस्तू आणि सूरक्षा संच शासनाकडून मोफत देण्यात येत आहे.
यातून आपली नक्कीच आर्थिक उन्नती होणार आहे. समाजातील किंमत कष्टावर अवलंबून असते. कष्टाचं मोल व्हावं, तुमच्या घरामध्ये देखील गणपती सणाआधी अपेक्षित आर्थिक लाभ मिळावा, यासाठी तालुकानिहाय पहिल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कामगार विभागामार्फत मुलांचे प्राथमिक शिक्षण ते लग्नापर्यंत साठीच्या विविध योजना राबविल्न्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकांने आपल्या तालुकाठिकाणी दरवर्षी नोंदणी करणे गरजेचं आहे. योजनामधून प्राथमिक शिक्षणासाठी २ हजार ५०० रुपये, ८ ते १० वीतील विद्यार्थ्यांसाठी ५ हजार रुपये, १० वी नंतरच्या शिक्षणासाठी २० हजार रुपये, अपघातात मृत्यू झाल्यास ५ लाख, नैसर्गिक मृत्यू झाल्यास २ लाख रुपये, मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार रुपये मिळतात. त्यामुळे आपण स्वत: नोंदणी करण्यासाठी तसेच इतरांना, आपल्या शेजाऱ्यांना देखील नोंदणी बाबत सांगण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
तालुकास्तरावरील एजन्सीने देखील गावागावात जाऊन कामगारांच्या नोंदणी करुन घ्यावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, मुलं जन्माला आल्यापासून ते आई वडीलांना तीर्थ क्षेत्र फिरायला पाठविण्यापर्यंत विविध योजना शासन राबवित आहे. माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, तीर्थ दर्शन योजना, वयोश्री योजना, शुभमंगल योजना आदी योजनांचा आपण लाभ घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले. सहाय्यक आयुक्त कामगार म्हणून उत्तम काम करणारे संदेश आयरेंचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले.
संतोष आंबेकर, संभाजी चांदे आदींना यावेळी गृहपयोगी वस्तू व सुरक्षा संचचे प्रातिनिधिक स्वरुपात पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. महेश अवसरे यांचा बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्याने महिमा अवसरे यांना सहाय्यता निधी म्हणून ५ लाखांचा धनादेश, सुधीर जाधव या नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याने सिध्दांत जाधव यांना २ लाखांचा धनादेश, संजय शंकर जाधव यांना नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहासाठी ५१ हजारांचा धनादेश, नोदणीकृत बांधकाम विवाहासाठी प्रथमेश सुरेश पांचाळ यांना ३० हजारांचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. आयरे यांनी केले.