देवरूख आगारातील लाल पऱ्या दोन दिवस बहिणींच्या सेवेला !
देवरुख – कालपासून दिवसभर देवरूख बस स्थानकावर एक सुचना फलक झळकत होता. दिनांक २१ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट रोजी काही गावात प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असणारी लाल परी धावणार नाही. मुख्यमंत्री रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. बहुतांश बहिणी आनंदात आहेत. अवघे कुटूंब आनंदात असताना, कुठून हा प्रपंच मंत्री महोदयांना आठवला कोण जाणे ! दोन दिवस ज्या गावांमध्ये एसटी सोडली जाणार नाही, त्या गावातील सामान्य जनतेला देवरूख बाजारपेठेत मध्यवर्ती ठिकाणी काही कामानिमित्त यायचे झाल्यास खाजगी वाहनांचा अवलंब करावा लागेल. शासनाने मदत करून त्या मोबदल्यात काही अपेक्षा ठेवणे रास्त आहे, पण त्यासाठी सर्व सामान्यांचा त्रास वाढवून अपेक्षाभंग झालाच तर कोण जबाबदार ?
मुख्यमंत्री महोदयांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचलले पाऊल खरोखरच स्वागतार्ह आहे. ज्या महिलांना तीन हजार रुपये प्राप्त झाले आहेत, त्या महिला मुख्यमंत्र्यांना भेटायला रत्नागिरीत चालल्या खऱ्या पण उर्वरित महिला आपल्या रोजच्या कामासाठी घराबाहेर पडतात त्या लाल परीच्या सहाय्याने, तुटपुंज्या मिळकतीचे साधन हे शहराच्या ठिकाणी प्राप्त होते आता दोन दिवस एसटी गावात येणार नाही.
या महिला प्रवास कसा करणार?
शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आपल्या शाळा महाविद्यालयात कसे पोहचणार ? खरच हा भुर्दंड सामान्यांवर लादणे योग्य आहे का ?
लहरी राजा प्रजा आंधळी…..अशीच ही परिस्थिती!