शाही लग्नाअगोदर अंबानी कुटुंब लावणार वंचितांचे विवाह; पालघर जिल्ह्यातील ‘या’ गावात होणार सामूहिक विवाह सोहळा…

Spread the love

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तर मुकेश आणि नीता अंबानी यांनी वंचित जोडप्यांसाठी सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा येथे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेत दोन तारखेला हा सामूदायिक विवाह सोहळा पार पडणार आहे.

*पालघर :* उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका यांच्या शाही विवाह सोहळ्याची गेल्या सहा महिन्यांपासून जोरदार तयारी सुरू आहे. एकीकडं शाही विवाह सोहळा आणि दुसरीकडं सामाजिक भान जपण्याचं पाऊल अशा दोन्ही दृष्टीनं अंबानी कुटुंबीय विविध उपक्रम राबवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अंबानी कुटुंबानं वंचितांसाठी सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे.

*दोन तारखेला सामूहिक विवाह सोहळा :*

पालघर जिल्ह्यातील वाडा इथं स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेत दोन तारखेला हा सामूहिक विवाह सोहळा होणार असून, त्यासाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. मुख्य विवाह सोहळ्या अगोदर अंबानी कुटुंबानं देश-विदेशात विविध प्री-वेडिंग समारंभ आयोजित केले. अलीकडंच अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या आमंत्रणाची पत्रिका व्हायरल झाली. त्यामध्ये उच्च प्रोफाईल प्री-वेडिंग उत्सवाच्या तयारीची झलक दिसून आली.

*मंगळवारी पालघरमध्ये सामूहिक विवाह सोहळा :*

या वर्षाच्या सुरुवातीलाच अनंत आणि राधिकानं जामनगरमध्ये लग्नाआधीचे अनेक सोहळे आयोजित केले. त्यात जगभरातील उद्योजक, राज्य प्रमुख, हॉलीवूड आणि बॉलीवूडमधील सेलिब्रिटी उपस्थित होते. लग्नाआधीच्या सेलिब्रेशनचा एक मुख्य भाग म्हणून मुकेश आणि नीता अंबानी यांनी वंचितांसाठी सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले आहेत. त्यातील एक विवाह सोहळा दोन जुलै रोजी वाडा येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिरात होणार आहे. पालघरसारख्या आदिवासी जिल्ह्यात हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करुन अंबानी कुटुंबानं आपल्या सामाजिक बांधिलकीची प्रचिती दिली आहे. या विवाह सोहळ्याला अंबानी कुटुंबातील कोण कोण उपस्थित राहणार, याकडं आता लक्ष लागलं आहे.

*शाही विवाह सोहळा वांद्रे-कुर्ला संकुलात :*

अनंत आणि राधिकाचा मुख्य विवाह सोहळा मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील प्रतिष्ठित ‘जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर’मध्ये होणार आहे. त्या अगोदर ‘रिलायन्स फाउंडेशन’च्या संस्थापक अध्यक्ष नीता अंबानी यांनी वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन भगवान शिवाला लग्नाचे पहिले निमंत्रण दिले आणि आशीर्वाद घेतले. अनंत आणि राधिकाच्या मुख्य विवाह सोहळ्या अगोदरच प्री-वेडिंग समारंभाचे काही कार्यक्रम आयोजित केले आहेत.

*असे असतील कार्यक्रम :*

हिंदू वैदिक रीतीरिवाजांचं पालन करुन अनंत आणि राधिका यांच्या विवाह सोहळ्याचं काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. १२ जुलै रोजी विवाहाचा मुख्य उत्सव सुरू होणार आहे. तर १३ जुलैला शुभ-आशीर्वादाचं उत्सव सुरू राहतील. अंतिम कार्यक्रम मंगल उत्सव आणि लग्नाचा स्वागत समारंभ १४ तारखेला आयोजित करण्यात आला आहे. ‘एन्कोर हेल्थकेअर’चे ‘सीईओ’ वीरेंद्र मर्चंट आणि उद्योजक शैला मर्चंट यांची मुलगी राधिका आता अंबानी कुटुंबात सामील होणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page