गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक हिंदू नागरिक आपल्या घराबाहेर गुडी उभारत असतो. याला धार्मिक महत्व आहे. प्रभू रामचंद्र हे वनवास संपवून आयोध्येत आले तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. दारात उभारण्यात येणारी गुढी ही सुख, शांती आणि समृद्धीचं प्रतिक मानले जाते.
Gudi Padwa 2024-
गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणं चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या दिवशी असतो. या दिवशी अनेक शुभकार्यांची सुरूवात केली जाते. तसेच या दिवशी नवीन वस्तूची, सोन्याची खरेदी केली जाते. या दिवशी साखरेपासून तयार करण्यात येणाऱ्या ‘साखर गाठीला’ देखील फार महत्त्व असते.
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त…
हिंदू पंचांगानुसार, चैत्र महिन्याची प्रतिपदा 8 एप्रिल 2024 रोजी रात्री 11 वाजून 50 मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी 9 एप्रिल 2024 ला रात्री 8 वाजून 30 मिनिटपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार मंगळवारी 9 एप्रिलला सकाळी 06:02 ते 10:17 मिनिटांपर्यंत गुढीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे.
काय आहे पूजा विधी…
शुभ मुहूर्तावर गुढी उभारण्यासाठी उंच बांबूच्या काठीला प्रथम तिळाचं तेल लावून त्यानंतर पाण्यानं शुद्ध करावं. त्यानंतर काठीच्या वरच्या टोकाला साडी चोळी किंवा स्वच्छ वस्त्र, कडुलिंब, आंब्याची डहाळी, फुलांची आणि साखरेच्या गाठीची माळ बांधावी. त्यावर चांदी किंवा तांब्याचं कलश उलटा ठेवावं. ज्या ठिकाणी तुम्ही गुढी उभारणार आहेत तिथे पाट किंवा चौरंग ठेवावे. त्यावर नारळ ठेवून कलशाची स्थापना करावी. त्यानंतर यावर तुमची गुढी उभारावी. गुढीला हळद कुंकू लावा आणि नैवेद्य दाखून नमस्कार करा.
अशी आहे आख्यायिका…
शालिवाहन या राजानं शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा होय. शक सुरु करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरले. मग या सैन्यांच्या मदतीनं त्यानं शत्रूंचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे.