
पुणे- राज्यावर वर्षाच्या शेवटी व नवीन वर्षाच्या सुरवातीला आस्मानी संकट कोसळणार आहे. राज्याच्या हवामानात मोठा बदल होणार असून अवकाळी पाऊस व थंडीची लाट असे दुहेरी संकट येणार आहे. यामुळे बळीराजाच्या पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर पुढील दोन दिवस धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक जिल्ह्याचा घाट विभाग, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट विभाग, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य व लगतच्या पश्चिम मध्य बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्र प्रदेश व उत्तम तामिळनाडू किनारपट्टीवर असलेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेकडे सरकले आहे. पुढील २४ तासांत त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ते काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज २६ व २७ डिसेंबररोजी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्याच्या मैदानी तसेच घाट विभाग व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना वीजांचा कडकडाट व सोसायट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर वाऱ्याचा वेग हा ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता आहे.
२७ डिसेंबर रोजी अहिल्यानगर, पुणे, जिल्ह्याचा मैदानी तसेच घाट विभाग, परभणी, बीड, नागपूर हिंगोली, वाशिम व यवतमाळ जिल्ह्याच्या तुरळक भागात मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसायट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ५० ते ६० किलोमीटर ताशी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. २७ तारखेला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व जालना तसेच विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा व वर्धा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर २८ डिसेंबरला जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, अमरावती, गोंदिया, व नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी, मेघगर्जना व विजांच्या कडकडाट व जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.