जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | नोव्हेंबर १०, २०२३.
“डॉ. विवेक विलास पनवेलकर यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांनी रत्नागिरी ग्रामीण भागातील सर्व पशुपालक शेतकऱ्यांना अगदी समर्पित भावनेने सेवा दिली आहे. विशेष म्हणजे स्वतः अधिकारी असूनही त्यांनी ग्रामीण भागात जाऊन केवळ पुस्तकी पंडिताप्रमाणे उपदेश न देता शारीरिक श्रमदान करून मदत केली आहे. त्यांनी स्वतः वेळ काळ न बघता पशुपालक शेतकऱ्यांना केलेली मदत ही अनमोल आहे त्याची तुलनाच करता येणार नाही.” अशी भूमिका मांडत भाजपा रत्नागिरी (दक्षिण) तालुकाध्यक्ष श्री. संयोग (दादा) दळी यांनी स्वर्गीय डॉ. विवेक पनवेलकर यांचे नाव चंपक मैदानात बांधण्यात येणाऱ्या पशु चिकित्सलायाच्या एका कक्षाला नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनासोबत ग्रामीण भागातील अनेक पशुपालक शेतकऱ्यांच्या सह्यादेखील जोडण्यात आल्या आहेत. याप्रसंगी श्री. दळी यांच्यासोबत भाजपा रत्नागिरी (उत्तर) चे तालुकाध्यक्ष श्री. विवेक सुर्वे, तालुका उपाध्यक्ष श्री. दिलीपकाका पटवर्धन, तालुका सरचिटणीस श्री. उमेश देसाई, श्री. अभय लाकडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.