पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ५११ स्व. प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचे दृकश्राव्य प्रणालीद्वारे उद्घाटन

Spread the love

संगमेश्वर तालुक्यातील कडवईच्या भाईशा घोसाळकर हायस्कूल आणि ज्यु. कॉलेजला प्रशिक्षण सुविधा उपलब्ध.

जनशक्तीचा दबाव न्यूज | संगमेश्वर | ऑक्टोबर २०, २०२३.

तालुक्यातील भाईशा घोसाळकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कडवई येथे काल गुरूवार दि. १९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ०४:३० वा. स्व. प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले. दृकश्राव्य माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमासाठी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयातून तर राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, श्री. अजितदादा पवार तसेच कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी सह्याद्री अतिथीगृहातून उपस्थिती लावली. ५११ कौशल्य विकास केंद्रांवरून जवळपास ५ लाखांहून अधिक विद्यार्थी, शिक्षक, संस्था पदाधिकारी आणि कार्यकर्ते बंधू-भगिनी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

केंद्र सरकारच्या कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने स्व. प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळ कडवईच्या भाईशा घोसाळकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कडवई येथे सुरू करण्यात आले असून संपूर्ण महाराष्ट्रातील तब्बल ५११ केंद्रांचे उद्घाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की रोजगारासाठी तरुणांचे गावातून शहरात स्थलांतर होऊ नये, या दृष्टीने कौशल्य विकास केंद्राची ही संकल्पना राबवण्यात येत असून भविष्यात राज्यातील या केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. आज राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये ५११ केंद्रे सुरू करण्यात आली. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ११ केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. कडवई हे संगमेश्वर तालुक्यातील एकमात्र केंद्र आहे.

ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार प्राप्त व्हावा हा यामागील उद्देश आहे. कडवई येथे १८ ते ४५ वयोगटातील तरुणांसाठी तीन महिने संगणक प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ‘कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र’ या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी तालुक्यातून सुमारे पाचशे पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सत्यवान मुळे, तहसीलदार श्रीम. अमृता साबळे, संस्थेचे सचिव श्री. वसंत उजगावकर, मुख्याध्यापक श्री. शेषराव अवघडे, संस्था सदस्य श्री. गंगाधर पंडित, श्री. संजय घोसाळकर, श्री. रमाकांत पुरोहित, श्री. विलास पुरोहित, मंडलाधिकारी श्री. मोरे, विस्तार अधिकारी श्री. पवार, शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष श्री. मिलिंद चव्हाण, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वरचे प्राचार्य श्री. रवींद्र लोकरे, सरपंच श्रीम. विशाखा कुवळेकर, उपसरपंच श्री. दत्ताराम ओकटे, भाजपचे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री. प्रमोद अधटराव, तालुकाध्यक्ष श्री. विनोद म्हस्के, रत्नागिरी (दक्षिण) जिल्हा चिटणीस श्रीम. कोमल रहाटे, श्री. राकेश जाधव, संगमेश्वर (उत्तर) तालुका सरचिटणीस श्री. अमित ताठरे, श्री. मिथुन निकम, शिक्षक-पालक संघाचे श्री. अशोक उजगावकर, श्री. संजय उजगावकर, आय.टी.आय. प्राध्यापक श्री. संतोष रहाटे, श्री. विलास पवार, श्री. विजय गिरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश कुंभार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर यांचे सर्व कर्मचारी, महसूल विभाग कर्मचारी, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. शाळेतील एन.सी.सी. कॅडेटचे चांगले सहकार्य लाभले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page