दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या दिवाळीत राज्यावर पावसाचे सावट आहे. काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे- राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुलाबी थंडीची चाहूल लागली होती. हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झाल्याने व हवामान कोरडे झाल्याने सकाळी आणि रात्री थंडी पडू लागली होती. मात्र, दाना चक्रीवादळाचा तडाखा ओडिशाच्या किनारपट्टीला बसल्यावर हवेतील बाष्प पश्चिमेकडे वळले आहे. त्यामुळे राज्यात ऐन दिवाळीत पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवली असून पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
राज्यातून नैऋत्य मोसमी वारे माघारी फिरले. असे असतांना देखील राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात काही तुरळक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र व बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी पाऊस झाला. गेल्या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी झाले. मात्र, त्यानंतर तापमानात वाढ झाल्याने ‘ऑक्टोबर हिट’ देखील नागरिकांनी अनुभवली.
दरम्यान, राज्यात आता पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने २९ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. २९ व ३० ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, जालना, परभणी, हिंगोली, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ३१ ऑक्टोबरला यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट व पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आज पासून पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी हवामान ढगाळ राहणार असून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.