*मुंबई-* उरण येथील यशश्री हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी दाऊद शेखला आज कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला 7 दिवसांची पोलिस ठोकडी सुनावली आहे. दाऊद शेखला मंगळवारी कर्नाटकच्या गुलबर्गा येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला आज मुंबईतील कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते.
नवी मुंबई पोलिसांनी आरोपीच्या ताब्याची मागणी केली होती. यावर सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने दाऊदला पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस दाऊदची चौकशी करणार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दाऊदने आपला गुन्हा कबुल केला आहे. त्यानेच यशश्री शिंदेची हत्या केली आहे. त्याने हत्या का केली? त्याचे आणि यशश्री शिंदेचे काय संबंध होते? याबाबत पोलिस चौकशी करणार आहेत. यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीचा रायगड जिल्ह्याच्या उरणमध्ये हत्या झाली. यशश्रीची हत्या लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा कुटुंबीयांचे म्हणणे आहे. दाऊद शेख नावाच्या व्यक्तीने ही हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.त्या दिवशी यशश्री सकाळी 11 वाजता मैत्रीणीकडे गेली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. थेट तिचा मृतदेहच उरण रेल्वे स्टेशनजवळ सापडला असल्याचं तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. ती बेलापूरला नोकरीला होती. हाफ डे घेऊन ती कामावरून लवकर निघाली होती, अशी माहिती समोर आली होती.
*सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती-*
घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यात दाऊद यशश्रीचा पाठलाग करताना दिसला. विशेष म्हणजे, कर्नाटकमधून पोलिसांनी अजून एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. घटनेच्या दिवशी आरोपी दाऊद हा त्या व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही. त्याची चौकशी करण्यात येत आहे. दाऊद आणि त्याच्यामध्ये काय संवाद झाला, याचा तपास पोलिस करत आहेत.
*काय आहे प्रकरण-*
25 जुलै रोजी नवी मुंबईतील उरण पोलिस ठाण्यात यशश्री शिंदे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर 26 जुलैच्या रात्री या मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला. त्यानंतर 27 जुलैला सकाळी खुनाचा गुन्हा दाखल केला. दाऊद शेख पूर्वी उरणमध्ये राहत होता. तो आणि मृत मुलगी दोघेही त्याच ठिकाणी राहत होते. पण त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर तो कर्नाटकात गेला. तो तिथे ड्रायव्हर म्हणून काम करायचा. त्याने एक-दोन कंपन्याही बदलल्या होत्या.