*मुंबई-* शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तथा भाजप नेते देवेंद्र यांच्यातील राजकीय कटूता एका नव्या उंचीवर पोहोचली आहे. उद्धव यांनी बुधवारी फडणवीसांना ‘आता एक तर तू राहशील किंवा मी’ अशा शब्दांत अत्यंत निर्वाणीचा इशारा दिला. तसेच आपल्या शिवसैनिकांना बिनधास्तपणे अंगावर चालून जाण्याचे आदेशही दिले. त्यांच्या या भूमिकेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात बुधवारी येथील रंगशारदा सभागृहात शिवसैनिकांचा मेळावा झाला. या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली. देवेंद्र फडणवीस यांनी मला व आदित्य ठाकरे यांना तुरुंगात डांबण्याचा डाव रचला होता. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला ही गोष्ट सांगितली होती. आता एक तर तू राहशील किंवा मी राहीन. यापुढे हात उगारणाऱ्यांचा हातच जागेवर ठेवायचा नाही, असे उद्धव ठाकरे यावेळी फडणवीस यांना इशारा देत म्हणाले.
*हर हर महादेव म्हणून अंगावर तुटून पडा*
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, लढाईला तोंड फुटताना शिवाजी महाराज व मावळे हर हर महादेव म्हणत शत्रूवर तुटून पडायचे. तसे आपल्यावर आपल्या शत्रूंवर तुटून पडायचे आहे. आम्हाला लोकसभेत आणखी मोठ्या विजयाची अपेक्षा होती. देशातील अनेक मोठ्या नेत्यांनी माझ्याशी संवाद साधला. आम्ही देशाला नवी दिशा दाखवल्याचे ते म्हणाले.
*मी पंतप्रधान मोदींनाही घाम फोडला*
लोकसभा निवडणुकीत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असा नडलो की त्यांना घामच फुटला. आता त्यांचे भाषण पाहताना किव येते. त्यांनी 1 वर्षे अंडी उबवली काय? आम्ही असेच आहोत. वाकड्यात गेलो की तोडून टाकतो. भाजप हा चोर व राजकीय षंढांचा पक्ष आहे. त्यांचे मनसुबे राज्याला भिकारी बनवणारे आहेत. मुंबईला ओरबाडले जात असताना मी शांत बसू शकत नाही. शिवसेना एक तळपती तलवार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
*बुटचाट्यांनी खुर्चीसाठी आईच्या कुशीवर वार केले…*
हे व्यापारी आपल्यात फूट पाडत आहेत. त्यांच्या खाण्याला काही मर्यादा आहे की नाही. धनाढ्य व चोऱ्यामाऱ्या करणारे पुन्हा मतदार नोंदणी करत आहेत. त्यामुळे यावेळी झोपून राहिलो तर मुंबई उपऱ्यांच्या हातात जाईल. मराठी माणसांना प्रवेश नाही म्हणतात. असे कुणी म्हणाले तर पहिल्यांदा कानफाट फोडा. त्यांना गुजरातला हाकलून द्या. हे बुटचाटे लाचार खुर्चीसाठी आईच्या कुशीवर वार करत आहेत, असेही उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.
*उरली सुरली गरमीही उतरवणार..*
मुंबईत सध्या कंत्राटदार माझा लाडका योजना सुरू आहे. सर्वत्र पाणी तुंबत आहेत. हे विकास पुरुष आहेत. आरेची जमीन मुंबै बँकेला दिली जात आहे. अदानी माझा लाकडा सुरू आहे. सध्या मुंबईच्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचाराला यावे. तेव्हा आम्ही त्यांची उरली सुरली गर्मीही काढून टाकू, असेही उद्धव ठाकरे यावेळी मोदींवर निशाणा साधताना म्हणाले.