पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियात इतिहास रचला आहे. त्यांनी 22 वर्षांनंतर वनडे मालिका जिंकली आहे.
पर्थ : पर्थ इथं खेळल्या गेलेल्या शेवटच्या आणि निर्णायक वनडे सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघानं यजमान विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं 141 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, जे मोहम्मद रिझवानच्या संघानं केवळ 26.5 षटकांत पूर्ण केलं. या विजयासह पाकिस्ताननं 3 सामन्यांची वनडे मालिका 2-1 नं जिंकली आहे. नवा कर्णधार मोहम्मद रिझवाननं ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर पराभूत करुन इतिहास रचला आहे. कारण पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियात शेवटची वनडे मालिका 22 वर्षांपूर्वी जिंकली होती.
पाकिस्तान संघानं रचला इतिहास –
पर्थ इथं खेळल्या गेलेल्या या तिसऱ्या वनडे सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम फलंदाजी करताना 31.5 षटकात अवघ्या 140 धावांवर गारद झाला. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी 3, तर शेवटच्या सामन्यात हारिस रौफनं 2 बळी घेतले. यानंतर पाकिस्ताननं 2 गडी गमावून 141 धावांचं लक्ष्य गाठले. सॅम अयुब आणि अब्दुल्ला शफीक या सलामीच्या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. यानंतर मोहम्मद रिझवान 30 आणि बाबर आझम 28 धावा करुन नाबाद परतले.
8187 दिवसांनी रचला इतिहास :
पाकिस्तान संघाच्या या विजयाचा अंदाज यावरुन लावता येतो की, संघाला 22 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर वनडे मालिका जिंकण्यात यश आलं आहे. यापूर्वी 2002 मध्ये पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाचा वनडे मालिकेत 2-1 असा पराभव केला होता. जर आपण दिवसांच्या संदर्भात पाहिलं तर, पाकिस्ताननं 8,187 दिवसांनंतर ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडे मालिकेत प्रथमच ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. एवढंच नाही तर आपल्या वनडे क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्ताननं फक्त दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर पराभूत करण्यात यश मिळवलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत पाकिस्तानची कामगिरी –
▪️2024 मध्ये पाकिस्तान 2 – 1 ऑस्ट्रेलिया
▪️2017 मध्ये पाकिस्तान 1 – 4 ऑस्ट्रेलिया
▪️2010 मध्ये पाकिस्तान 0 – 5 ऑस्ट्रेलिया
▪️2002 मध्ये पाकिस्तान 3 – 2 ऑस्ट्रेलिया
या संपूर्ण मालिकेत पाकिस्तानी गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. हरिस रौफनं 3 सामन्यांत 10 तर शाहीन आफ्रिदीनं 8 विकेट घेतल्या. नसीम शाहला 5 विकेट घेण्यात यश आलं. मोहम्मद हसनैननं 3 बळी घेतले. सर्वाधिक विकेट्स घेतल्याबद्दल हारिस रौफला मालिकावीर आणि सामनावीर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये द्विपक्षीय मालिका जिंकली (सर्व फॉरमॅट)
▪️पाकिस्तान 2 – 1 ऑस्ट्रेलिया 2002
▪️पाकिस्तान 2 – 1 ऑस्ट्रेलिया 2024