*गेबेऱ्हा-* भारताने दक्षिण आफ्रिकेपुढे ठेवलेले १२५ धावांचे आव्हान माफक वाटत होते. पण ‘वरुणराजा’ यावेळी भारताच्या मदतीला धावून आला. कारण वरुण चक्रवर्तीच्या फिरकीच्या जाळ्यात यावेळी दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज अडकले होते. वरुणने यावेळी पाच बळी मिळवत सामना भारताच्या बाजूने झुकवला होता. वरुणने आपल्या चार षटकांत १७ धावा देत दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ गारद केला. पण त्यानंतर अखेरच्या षटकांत गेराल्ड कोएत्झीने जोरादार फटकेबाजी केली आणि सामना दोलायमान अवस्थेत पोहोचला होता. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने फटकेबाजी सुरु ठेवली आणि सामना तीन विकेट्स राखून जिंकला.
भारताला पहिल्या षटकात मोठा धक्का बसला होता. कारण यापूर्वीच्या दोन्ही सामन्यांत शतक झळकावणारा संजू सॅमसन यावेळी शून्यावर बाद झाला, त्याला भोपळाही फोडता आला नाही. संजू बाद झाल्यावर भारताचा डाव गडगडायला सुरुवात सुरुवात झाली. भारताचा दुसरा सलामीवीर अभिषेक शर्मा हा चार धावांवर बाद झाला. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवकडून यावेळी मोठ्या अपेक्षा होत्या. पण सूर्याला यावेळी फक्त चार धावांवर समाधान मानावे लागले. पण सूर्या बाद झाल्यावर भारताने आपली रणनिती बदलली आणि ती त्यांच्यासाठी यशस्वी ठरली.
भारतीय संघाने यावेळी अक्षर पटेलला बढती दिली आणि हार्दिक पंड्याच्या पुढे फलंदाजीला पाठवले. भारताची ३ बाद १५ अशी दयनीय अवस्था असताना अक्षर फलंदाजीला आला. अक्षरने तिलक वर्माबरोबर खेळताना चांगली भागीदारी रचली. पण तिलक यावेळी २० धावांवर बाद झाला. त्यानंतर अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या यांची भागीदारी चांगली रंगेल, असे वाटत होते. पण यावेळी दुर्देवीपणे अक्षर पटेल धावचीत झाला. अक्षरने यावेळी २१ चेंडूंत चार षटकारांच्या जोरावर २७ धावांची खेळी साकारली. अक्षर बाद झाल्यावर हार्दिकने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. हार्दिकने यावेळी ४५ चेंडूंत ३९ धावांची खेळी साकारली. त्यामुळेच भारताला यावेळी शंभर धावांचा पल्ला ओलांडता आला आणि दक्षिण आफ्रिकेपुढे १२५ धावांचे आव्हान ठेवता आले.