हेमंत पाटील, धैर्यशील मानेंसह शिंदेंच्या पाच जागा धोक्यात? भाजपचा विरोध कायम, जागा पडणार की पाडणार?…

Spread the love

मुंबई: राज्यात 45 पेक्षा जास्त खासदार निवडून आणायचं लक्ष ठेवलेल्या महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं दिसत नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी जगावाटावरून महायुतीत तिढा (Mahayuti Seat Sharing) निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी उमेदवार जाहीर होऊन देखील स्थानिक कार्यकर्त्यांकडून उमेदवाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. त्यातल्या त्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या (Eknath Shinde) काही उमेदवारांना भाजपचा अजूनही विरोध असून त्या ठिकाणी उमेदवार बदलण्याची मागणी केली जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आतापर्यंत आठ उमेदवार जाहीर करण्यात आलेल आहेत. महायुतीचे जागावाटप अद्याप जाहीर झालं नसलं तरी शिंदेंच्या वाट्याला 12 किंवा 13 जागा येणार असल्याची माहिती आहे. शिंदेंनी चार ते पाच ठिकाणच्या खासदारांना पुन्हा तिकीट देऊ नये अशी भूमिका भाजपने घेतली होती. त्यामध्ये नाशिक, हातकणंगले, यवतमाळ-वाशिम आणि हिंगोलीचा समावेश होता. तर ठाण्याची जागा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मिळावी असा आग्रह भाजपचा आहे.

एकनाथ शिदेंनी हातकणंगल्यातून धैर्यशील माने…यांना तर हिंगोलीतून हेमंत पाटलांना (Hemant Patil Hingoli) पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर यवतमाळ आणि नाशिकचा उमेदवार जाहीर केला नाही.

हेमंत पाटील यांना भाजपचा कडाडून विरोध…

महायुतीतील सर्वाधिक वादग्रस्त ठरू शकणारी जागा म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघ (Hingoli Lok Sabha Election). हिंगोलीमधून शिवसेनेने हेमंत पाटलांच्या नावाची जरी घोषणा केली असली तरी त्यांना असणारा भाजपचा विरोध मात्र कायम आहे. हेमंत पाटलांबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे त्यांची जिंकण्याची शक्यता कमी असल्याचा अहवाल असल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. ही जागा जर भाजपच्या वाट्याला आली तर भाजप सहजपणे खासदार निवडून आणेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

आता हेमंत पाटलांचं नाव घोषित केलं असलं तरी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मात्र त्यांना विरोध कायम केला आहे. हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत गोंधळ झाल्याचे दिसून आले. हा विरोध इतका आहे की शिवसेनेकडून हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घेण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहेत.

हातकणंगल्यात धैर्यशील मानेंना भाजपचा विरोध….

जी गत हिंगोलीची तीच गत आता हातकणंगल्याची (Hatkanangale Lok Sabha Election) आहे. हातकणंगल्यातून शिवसेनेने धैर्यशील माने यांच्या नावाची घोषणा केली आहे. पण त्यांना भाजपचा आधीपासूनच विरोध होता. हातकणंगल्याची जागा ही भाजपने लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत होती. त्यातच आता हातकणंगलेमधून इच्छुक असलेले भाजपचे नेते संजय पाटील हे धैर्यशील माने यांच्यावर नाराज आहेत. जोपर्यंत सन्मान नाही तोपर्यंत धैर्यशील मानेंचा प्रचार करणार नाही अशी भूमिका संजय पाटील यांनी घेतली आहे.

धैर्यशील माने यांच्याबद्दल हातकणंगलेमध्ये नकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे महायुतीचा एक खासदार कमी होऊ शकतो असं सांगत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मतदारसंघांमधील सर्व कल्पना दिली असल्याचं संजय पाटलांनी सांगितलं. धैर्यशील माने यांचा प्रचार करू नये असा कार्यकर्त्यांचा दबाव असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

नाशिकमधून हेमंत गोडसेंना भाजपचा विरोध….

हेमंत गोडसेंच्या नावाला असलेला विरोध लक्षात घेता शिवसेना शिंदे गटाने अद्याप नाशिकच्या उमेदवारीची घोषणा केली नाही. आपलं तिकीट कापलं जाणार हे लक्षात येताच हेमंत गोडसेंनी अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. पण तरीही त्यांना असलेला विरोध कमी करण्यास भाजपचे कार्यकर्ते तयार नाहीत. त्यातच आता नाशिकची जागा ही राष्ट्रवादीला जाणार असून त्या ठिकाणी छगन भुजबळ हे निवडणूक लढवतील असं म्हटलं जातंय.

नाशिक लोकसभेच्या जागेवरून छगन भुजबळ आणि हेमंत गोडसेंमध्ये रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे नाशिकच्या जागेवरून भाजप पुन्हा आक्रमक झाल्याचं दिसतंय. हेमंत गोडसेंना उमेदवारी दिल्यास भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.

भावना गवळींचीं उमेदवारी धोक्यात?…

शिंदेच्या आणखी एका नावाला भाजपचा कडाडून विरोध आहे आणि ते नाव म्हणजे यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी. या मतदारसंघात खासदार भावना गवळी पाच वेळा निवडून आल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीतही आपल्याला उमेदवारी मिळेल असा त्यांना आत्मविश्वास आहे. मात्र आता निवडणुकीत उमेदवारी मिळवताना त्यांना संघर्ष करावा लागत आहे.

भावना गवळी यांच्या नावाला भाजपचा विरोध असल्याने त्यांनी संजय राठोड यांचं नाव पुढे केल्याची चर्चा आहे. गवळींच्या विरोधात लोकांमध्ये नाराजी असल्याचं भाजपकडून सांगण्यात येतंय. त्याचमुळे याकाळात भाजप आणि शिंदे गटाकडून गवळींसह संजय राठोड यांच्या नावाची उमेदवार म्हणून चाचपणी करण्यात आली. मात्र अद्यापही उमेदवारीचा तिढा सुटला नाही.

लोकसभेचं तिकीट हे आपल्यालाच मिळणार असा विश्वास भावना गवळी यांनी केला आहे. पण दुसरीकडे संजय राठोड यांचंही नाव पुढे आल्याने त्यांना उमेदवारी मिळणार का असा प्रश्न उपस्थित होतोय.

ठाण्यावर भाजपचा दावा…

मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाण्याच्या जागेवर भाजपने दावा केल्याने वेगळाच तिढा निर्माण झाल्याचं दिसतंय. कल्याण किंवा ठाणे या दोन्हीपैकी एक जागा ही भाजपला मिळावी असा सुरुवातीपासून भाजपचा आग्रह आहे. त्यातल्या त्यात भाजपची वैचारिक बैठक पक्की करणाऱ्या रामभाऊ म्हाळगी आणि राम कापसे यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केल्याने भाजपची नाळ या मतदारसंघाशी जोडली गेल्याचं सांगण्यात येतंय. त्याचमुळे एकेकाळी आनंद दिघेंनी शिवसेनेसाठी काढून घेतलेला हा मतदारसंघ आता भाजपने ठाणे परत मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page