किसन वीर कारखान्याच्या माजी संचालक मंडळावर सीबीआयनं दाखल केला गुन्हा, काय आहे प्रकरण?

Spread the love

*वाई तालुक्यातील किसन वीर सहकारी साखर कारखानाच्या माजी संचालक मंडळावर बँक ऑफ इंडियाची 61 कोटी 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयनं गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.*

*सातारा  :* किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या माजी संचालक मंडळानं कारखान्याला कर्ज मिळण्यासाठी खोटी कागदपत्रं आणि माहिती देऊन 61 कोटी 15 लाखांची फसवणूक केल्याची तक्रार बँक ऑफ इंडियानं केली होती. त्यावरून कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष, माजी आमदार मदन भोसले, उपाध्यक्ष चंद्रकांत इंगवले, कार्यकारी संचालक अशोक जाधव यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामुळं पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

*विस्तारीकरणासाठी बँकेनं दिलं होतं 50 कोटींचं कर्ज :* किसन वीर सहकारी साखर कारखान्यास विस्तारीकरणासाठी बँक ऑफ इंडियानं 50 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं होतं. 2010 सालापासून कारखान्याचे आणि बँकेचे व्यवहारिक संबंध चांगले होते. त्यामुळं बँकेनं एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज मंजूर केले. ही रक्कम सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेत असलेल्या कारखान्याच्या करंट खात्यावर वळविण्यात आली. बँकेनं 1 कोटी 70 लाख 431 रुपये व्याज खात्यामध्ये जमा करून घेऊन ही रक्कम कारखान्याला दिली होती. त्यानंतर ही रक्कम कारखान्याकडून थकीत झाली.

*खोटी आर्थिक विवरणपत्रं जोडल्याचा आरोप :* कारखान्यानं डिस्टिलरी उभारणीसाठी डोंबिवली नागरी सहकारी बँकेकडून कर्ज घेताना बँक ऑफ इंडियाला दिलेली मालमत्ताच डोंबिवली बॅंकेला तारण देऊन बॅंक ऑफ इंडियाची फसवणक केली. कर्ज मिळवण्यासाठी कारखाना व्यवस्थापनानं खोटी आर्थिक विवरणपत्रं आणि कागदपत्रं सादर केली. तसंच बँकेच्या सुविधांचा गैरविनियोग केला, असं बँकेनं दिलेल्या तक्रारीत म्हटलंय.

*थकित कर्जावर कारवाईवेळी फसवणुकीचा प्रकार उघड :* कर्जाच्या थकबाकी प्रकरणी कारवाई करताना बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनाला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यामुळं बँक ऑफ इंडियाचे पुणे विभागीय व्यवस्थापक (वसुली) अनिल कुमार श्रीवास्तव यांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी सीबीआयकडं तक्रार दाखल केली होती. त्यावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त (नवी दिल्ली) मनीष नवलाखे पुढील तपास करत आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page