असं काय घडलं की उद्धव ठाकरेंची साथ सोडली? रवींद्र वायकर पक्षप्रवेशावेळी म्हणाले…

Spread the love

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अशी ख्याती असलेले आमदार रवींद्र वायकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशावेळी रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देवून आपण शिंदेंची साथ का धरली? यामागचं कारण सांगितलं आहे.

असं काय घडलं की उद्धव ठाकरेंची साथ सोडली? रवींद्र वायकर पक्षप्रवेशावेळी म्हणाले…

मुंबई | 10 मार्च 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अशी ख्याती असलेले आमदार रवींद्र वायकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निनासस्थानी वायकरांचा भव्य पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार गजानन कीर्तिकर होते. तसेच माजी नगरसेविका शीतल म्हात्रे या कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसल्या. यावेळी रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं कारण सांगितलं. आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी आपण शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमचे खासदार शिवसेना नेते गजानन कीर्तिकर, इथे बसलेले सर्व उपस्थित बंधू-बघिणी मातांनो, खरं म्हणजे मी गेली 50 वर्षे शिवसेनेत काम केलं आहे. 1974 ची पहिली जोगेश्वरीतील दंगल, त्यावेळपासून बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर जे पडेल ते काम शिवसेनेचं केलं आहे. चार वेळा नगरसेवक, चार वेळा स्टँडिंग कमिटी, तीन वेळा आमदार हे पर्यायाने आला. पण आता ज्यावेळेला मी इथे पक्षप्रवेश करतोय त्यामागचं कारण वेगळं आहे”, असं रवींद्र वायकर म्हणाले.

‘धोरणात्मक निर्णय लोकांसाठी बदलणं महत्त्वाचं’…

“पहिले तर कोविड होतं त्यावेळी कामं झाली नव्हती. पण आता जी कामे आहेत, प्रामुख्याने आरेच्या बाबतीत पाहाल, 173 कोटी रुपये मला आरेच्या रस्त्यासाठी पाहिजेत. लोकं रडत आहेत. आरेबाबत लोकं रडत आहे की, आमच्याकडे 45 किमीचे रस्ते होणे अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे रॉयल पंप सारख्या परिसरात अत्यंत उत्तम पाण्याची व्यवस्था परिपूर्ण नाही. अशावेळेला धोरणात्मक निर्णय लोकांसाठी बदलणं महत्त्वाचं असतं. अशा धोरणात्मक निर्णय बदलले नाहीत तर तिथल्या लोकांना आपण न्याय देऊ शकत नाही”, असं वायकर म्हणाले.

“माझ्या इथे पीएमजीबी कॉलनी आहे. या कॉलनीसाठी मी पत्रव्यावहार करायचो. त्या 17 बिल्डिंग पडल्या तर मग काय करायचं? हा मोठा प्रश्न आहे. सर्वोदय नगरचा प्रश्न आहे. एनडी झोनचा प्रश्न आहे. धोरणात्मक निर्णय हे सत्तेत असल्याशिवाय होऊ शकत नाही. सत्तेत असताना आपण धोरणात्मक निर्णय सोडवले तर तिथल्या लोकांना आपण न्याय देऊ शकतो. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता आहे. ते चांगलं काम करत आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचं काम सुरु आहे. माझ्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी इथे आलो आहे. हे प्रश्न सोडवले नाहीत तर मी लोकांसमोर जाऊ शकत नाही”, अशी भूमिका रवींद्र वायकर यांनी मांडली.

रवींद्र वायकर कोण आहेत?…

रवींद्र वायकर 1992 साली जोगेश्वरीतून पहिल्यांदा शिवसेनेचे नगरसेवक बनले. 2006 ते 2010 ही ४ वर्ष महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले. 2009, 2014, 2019 असे सलग ३ टर्म जोगेश्वरी पूर्वमधून शिवसेनेचे आमदार बनले. महायुती सरकारमध्ये गृहनिर्माण/उच्च तंत्रशिक्षणाचे राज्यमंत्री राहिले. मविआ सत्तेत आल्यानंतर गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री झाले. तेच वायकर आता ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानं ठाकरेंसाठी हा धक्का मानला जातोय. मात्र काल रात्री ठाकरेंसोबत असणाऱ्या वायकरांनी दुसऱ्याच दिवशी निर्णय कसा बदलला, आणि वायकरांवर घोटाळ्याचे आरोप करत अटकेचे इशारे देणारे भाजप नेते आरोपांचा पाठपुरावा करतील का? हा सुद्धा प्रश्न आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page