पुणे- गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा एका पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली असतानाच विदर्भासह राज्यात तरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
शनिवारी राज्यात पावसाची हजेरी…
दक्षिण बांग्लादेश आणि पश्चिम बंगालमध्ये वाहणाऱ्या चक्राकार वाऱ्यांमुळे या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. मॉन्सूनचा आस राजस्थानच्या फलोदीपासून, शिवपूरी, सिधी, रांची ते पश्चिम बंगालमधील कमी दाब क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये राज्यात उन्हाचा चटका कायम होता. मात्र आता शनिवारी राज्यात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
विजांसह पावसाचा इशारा…
हवामान खात्याने आज विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, अकोला, वर्धा, वाशीम, यवतमाळसह अनेक जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी शनिवारपासून जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर आणि जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला.
पहिल्या 15 दिवसांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस…
दरम्यान, ऑगस्ट महिन्यातील पहिल्या 15 दिवसांमध्ये तर पाऊस सरासरीपेक्षा 15 टक्के अधिक राहीला. तर 15 ऑगस्टपर्यंत यंदाच्या पावसाळ्यात 105 टक्के पाऊस पडला, असा हवामान विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. ला निना परिस्थिती ऑगस्ट महिन्याच्या शेवटी विकसित होऊ शकते, असा अंदाज आहे.