सोलापूर /जालना- माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आपला स्वराज्य पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे बुधवारी जाहीर केले. पक्षाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील भोसे येथे आयोजित महाएक्स्पो कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न हेही उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर संभाजीराजे तडक जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटी येथे दाखल झाले. या दोघांमध्ये सायंकाळी ७ ते रात्री १०.३० पर्यंत बंदद्वार चर्चा झाली. राजरत्न आंबेडकर व जरांगेंना सोबत घेऊन संभाजीराजे तिसरी आघाडी स्थापन करणार असल्याची चर्चा आहे.
बैठकीनंतर संभाजीराजे म्हणाले, ‘मी जरांगेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. आमची राजकीय चर्चा झाली, पण त्याचा तपशील आजच सांगता येणार नाही.’
जरांगेंनी बुधवारपासून इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या. नांदेडचे माजी खा. भास्कर खतगावकरांच्या सून मीनल पाटील यांनी जरांगेंची भेट घेऊन समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवून दिल्याबद्दल आभार मानले. तसेच नायगावमधून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली.
समीकरणे जुळली तर सत्तापरिवर्तन : जरांगे…
जरांगे म्हणाले, ‘निवडणुकीच्या रिंगणात आम्ही उतरणार आहोत, त्यासाठीच चर्चा सुरू आहे. सर्व समीकरणे जुळली तर सत्तापरिर्वतन अटळ आहे. पण समाजाला विचारल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही. त्यामुळे २९ ऑगस्ट रोजीच्या बैठकीनंतर आमचा निर्णय सांगू.’
जरांगे एकही उमेदवार देणार नाहीत; लक्ष्मण हाकेंचा दावा….
नाेज जरांगे यांच्यासारखी पाडापाडीची भाषा आम्ही करत नाही. आेबीसी मनुष्य आता वेडा राहिला नसून त्यास हक्काची जाणीव झाली आहे. मनाेज जरांगे विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा करणार नाहीत. ते बिनबुडाचा लाेटा आहेत, असा आरोप ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला. पत्रकार परिषदेत प्रा. हाके म्हणाले, ‘जरांगे यांना आंदाेलन करण्यास ज्या लाेकांनी प्रवृत्त केले त्यांच्या पक्षाला पाठिंबा देऊन लाेकसभेला आेबीसी उमेदवार पाडण्याचे पाप जरांगेंनी केले. त्यामुळे जरांगे हे विधानसभेला २८८ जागा साेडा तर एकही जागा लढवणार नाहीत. ते काेणत्या तरी आघाडीलाच पाठिंबा देतील. जरांगे विचारवंत किंवा संविधान मानणारे नाहीत. कारण ते एका बाजूला ९८ कुळी मराठा असल्याचे सांगतात व दुसऱ्या बाजूला आम्हाला मागासवर्गीय आेबीसीतून आरक्षण पाहिजे असे हास्यास्पद, विराेधाभासी वक्तव्य करतात.’