केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या इन्व्हेस्ट इंडियाच्या सहायक व्यवस्थापकांकडून पडताळणी,’वन डिस्ट्रीक वन प्रॉडक्ट’ ॲवार्ड 2023-24 साठी ,देशातील 60 जिल्ह्यांच्या नामांकनात रत्नागिरी…

Spread the love

रत्नागिरी, दि.26 (जिमाका):-  केंद्र शासनाच्या ‘वन डिस्ट्रीक वन प्रॉडक्ट ॲवार्ड 2023-24’ साठी देशातील 60 जिल्ह्यांच्या नामांकनामध्ये आणि राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीचा समावेश झाला आहे.  केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या इन्व्हेस्ट इंडियाचे सहायक व्यवस्थापक ताशी दोरजे शेर्पा यांनी आज याबाबत बैठक घेतली. शिवाया पडताळणीही केली.  जिल्ह्याने केलेल्या कामगिरीबद्दल रत्नागिरी जिल्हा हापूस आंबा उत्पादनात देशात एक ब्रँड झाला आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
  
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली.  ते म्हणाले, आंब्याबरोबरच काजू, नारळ, कोकम आणि मासे ही जिल्ह्याची उत्पादने आहेत.  2018 साली हापूस आंब्याला जीआय टॅग मिळाला आहे.  राज्यामध्ये 162.08 हजार हेक्टर क्षेत्रामध्ये आंबा क्षेत्र आहे.  त्यातून 463.17 हजार टन आंबा उत्पादन होते.  हेच प्रमाण कोकण विभागात 126.41 हजार हेक्टर लागवड क्षेत्रामध्ये 213.37 हजार टन आंबा उत्पादन होतो. तर एकट्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 67.79 हजार हेक्टर क्षेत्रामध्ये आंब्याची लागवड आहे. त्यातून 123.06 हजार टन आंबा उत्पादन होतो. 2022-23 ला कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 67 हजार 796  हेक्टर क्षेत्रामध्ये आंब्याची लागवड करण्यात आली आहे. त्यामधून 1 लाख 23 हजार 68 मे. टन आंबा उत्पादन घेवून, रत्नागिरी प्रथम क्रमांकावर राहिला आहे.



2022-23 आणि 2023-24 वर्षासाठी रत्नागिरी जिल्ह्यामधून आंबा निर्यात करुन अनुक्रमे 145.98 लाख व 250.86 लाख इतके उत्पन्न मिळाले आहे. हापूस आंब्याची सर्वाधिक आयात करणारे देश कुवेत, संयुक्त अरब अमिराती, युनायटेड किंग्डम, कतार, ओमान, युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका, बहरिन आणि कॅनडा आहेत.  तत्कालीन पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत नेहमीच बैठका घेवून मार्गदर्शन केले आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.


केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या इन्व्हेस्ट इंडियाचे सहायक व्यवस्थापक श्री. शेर्पा यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, देशातील 60 जिल्ह्यातील आणि राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश आहे.  क्यू आर कोड, मोबाईल कुलिंग युनिट या सारखी चांगली कामगिरी आणि खूप चांगले काम तुम्ही सर्वांनी केले आहे. हापूस आंब्याच्या संदर्भात रत्नागिरी हा एक देशात ब्रँड झाला आहे. 

जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश हणबर यांनी स्वागत करुन सर्वांचे आभार मानले.  बैठकीला एमएसएमईचे मिलिंद जोशी, डीआयसीचे व्यवस्थापक संकेत कदम, डॉ. विवेक भिडे, माविमचे जिल्हा समन्वयक अंबरीश मिस्त्री, हापूस आंबा उत्पादक संघाचे मुकुंदराव जोशी आदी उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page