उद्धव ठाकरे यांच्याकडून मुस्लीम मतपेढीचे राजकारण; केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे टीकास्त्र…

Spread the love

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी शहा यांची शुक्रवारी येथे जाहीर सभा झाली. – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

रत्नागिरी : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नादी लागून नकली शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुस्लीम मतपेढीचे राजकारण करत आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी शहा यांची शुक्रवारी येथे जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांत देशाची सुरक्षितता, नक्षलवाद्यांचा बिमोड, राम मंदिराची निर्मिती, अनुच्छेद ३७० रद्द करण्याची कार्यवाही, विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना इत्यादींची जंत्री सादर केली.

उद्धव ठाकरेंना लक्ष्य करताना शहा म्हणाले की, ठाकरेंनी सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस आणि पवारांपुढे शरणागती पत्करली आहे. अशी व्यक्ती महाराष्ट्राचा स्वाभिमान राखू शकत नाही. तिहेरी तलाक, समान नागरी कायदा, मुस्लिम व्यक्तिगत कायदा इत्यादी मुद्दयांवर ते भूमिका घेऊ शकत नाहीत. आत्तापर्यंत काँग्रेसकडे असलेली मुस्लिम मतपेढी आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांनी ही तडजोड केली आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला असला तरी बाळासाहेबांचा वारसा एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि नारायण राणे चालवत आहेत.

नारायण राणेंना मिळणारे प्रत्येक मत हे मोदींना मत..

ते पुढे म्हणाले, “नारायण राणे यांना मिळणारे एक एक मत मोदींना मिळणार आहे. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले तर आता जागतिक अर्थव्यवस्थेत पाचव्या क्रमांकावर असलेला भारत तिसऱ्या स्थानावर येईल. स्वतःच्या स्वार्थसाठी, मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस च्या मांडीवर जाऊन बसले, ते राष्ट्रवादी आणि काँग्रेवाले ३७० कलम रद्द होऊ नये म्हणून विरोध करत होते. राणेंच्या मंत्रालयात मोदींच्या मार्गदर्शनाखाली चांभार, लोहार अशी २० प्रकारची छोटे छोटे उद्योग करणाऱ्या विश्वकर्मा समाजासाठी १३ हजार कोटींचा प्रकल्प सुरू आहे.”

लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात विरोधक सत्तेवर आले तर अस्थिर सरकार स्थापन होईल, असा इशारा देऊन, जगातील तिसरी आर्थिक सत्ता बनण्याचे, विकसित भारताचे स्वप्न पाहणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा विजयी करा, असे आवाहन शहा यांनी केले.

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार शेखर निकम, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, भाजपनेत्या चित्रा वाघ, शिवसेनानेते किरण सामंत, माजी आमदार बाळ माने यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी ही रत्नांची खाण…

गृहमंत्री शहा म्हणाले, “रत्नागिरी, सिंधुदुर्गची ही भूमी पवित्र असून अनेक रत्नांची खाण आहे. लोकमान्य टिळक, वीर सावरकर यांच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या भूमीत वीर सावरकर यांना तुरुंगात ठेवण्यात आले. त्यांनी आपले आयुष्य हिंदुत्त्वासाठी दिले; मात्र आज उद्धव ठाकरे यांना याच सावरकरांचे नाव आपल्या भाषणात घ्यायला लाज वाटते… अरे कसली शिवसेना तुमची? उद्धव ठाकरे हे नकली शिवसेना चालवत असून, खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यसोबत आहे.”

इंडिया आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब : अमित शहा ..

“उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही नकली असून, इंडिया आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गतील लोकांनी ठरवायचे आहे की त्यांना मोदींबरोबर जायचे आहे की औरंगजेब फॅन क्लब सोबत”, अशा शब्दांत टीका करतानाच भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांचा पाढा उपस्थितांसमोर वाचला.

डॉ. आंबेडकरांचा उल्लेख नाही…

भाषणाच्या सुरुवातीला शहा यांनी ‘भारतरत्न’ किताबाचे रत्नागिरी जिल्ह्यातील मानकरी म्हणून फक्त कै. पां. वा. काणे आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा उल्लेख केला. मात्र भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह आणखी चार भारतरत्नांचा नामोल्लेख त्यांनी केला नाही.

वादग्रस्त कोकरे महाराजांचेही भाषण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, महायुतीचे उमेदवार नारायण राणे इत्यादींनी सभेत भाषणे केली. गोशाळेसाठी महाराष्ट्राच्या औद्योगिक विकास महामंडळाची लोटे येथील जमीन लाटल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले कोकरेमहाराज यांनीही या सभेत जोरदार भाषण केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page