यवतमाळ- यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची आज सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत हेदेखील उपस्थित होते. मात्र सभेदरम्यान त्यांच्या ताफ्यातील गाडीवर एका अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याची घटना घडली आहे.
यवतमाळमध्ये शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली आहे. यवतमाळच्या राळेगावमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेदरम्यान हा प्रकार घडला आहे. एका अज्ञाताने ही दगडफेक केली आहे. ही सभा सुरू असताना पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या उदय सामंत यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने दगड मारून काच फोडण्याचा प्रयत्न केला. या दगडफेकीत त्यांच्या गाडीची समोरची काच तडकली आहे. सभा संपल्यानंतर गाडीत बसताना पोलीस कर्मचारी तसेच उदय सामंत यांच्या ही बाब लक्षात आली. या संदर्भात तातडीने राळेगाव पोलिसांना माहिती देताच त्यांनी घटनेची दखल घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे.