सध्या माघ महिना सुरू असून याच महिन्यात हिंदू पंचांगानुसार गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या गणेश जयंतीला माघी गणेश जयंती असे ही म्हटले जाते. आज ही माघी गणेश जयंती असून या जयंतीला माघी गणेश चतुर्थी, माघ विनायक चतुर्थी आणि वरद चतुर्थी असे ही म्हटले जाते.
आजच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा पुत्र असलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांची पूजा केली जाते. आजच्या दिवशी विधीनुसार गणपती बाप्पांची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे. ही पूजा केल्याने भक्तांच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात असा देखील मानले जाते. चला तर मग जाणून घेऊयात माघी गणेश जयंतीच्या पूजेचे महत्व आणि पूजा करण्याची पद्धत.
गणेश जयंतीच्या पूजेचा शुभ मुहूर्त…
सोमवारी (१२ फेब्रुवारी २०२४) संध्याकाळी ५ वाजून ४४ मिनिटांनी माघ महिन्याची शुक्ल पक्ष चतुर्थी सुरू होते. या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीची समाप्ती आज अर्थात १३ फेब्रुवारी २०२४ ला मंगळवारी दुपारी २ वाजून ४१ मिनिटांनी होईल.
आजच्या गणेश जयंतीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आज सकाळी ११ वाजून २९ मिनिटांनी सुरू होणार असून हा शुभ मुहूर्त १ वाजून ४२ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे, या कालावधीमध्ये तुम्ही घरी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करू शकता. पूजेचा एकूण कालावधी हा २ तास १४ मिनिटांचा असणार आहे.
अशा पद्धतीने करा गणपती बाप्पांची पूजा..
▪️गणेश जयंतीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करा.
▪️स्नान केल्यानंतर गणपती बाप्पांची प्रार्थना करून आजचे व्रत करण्याचा संकल्प करा.
▪️आजच्या शुभ मुहूर्तावर घरातील पाट किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरा. आता त्यावर गणपती बाप्पांची फ्रेम किंवा गणेशाची मूर्ती स्थापित करा.
▪️त्यानंतर, गंगाजल किंवा गोमूत्र घरात शिंपडून बाप्पाला नमस्कार करा.
▪️आता गणपती बाप्पाला हळदी-कुंकू फुले, अक्षता आणि २१ दूर्वा वाहा.
▪️त्यानंतर, अगरबत्ती आणि धूप लावा.
▪️आता गणपतीचे स्तोत्र, गणपती अथर्वशीर्षचे पठण करा.
▪️त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करून मोदकांचा नैवेद्य दाखवा.