नेरळ- सुमित क्षीरसागर
नेरळ ग्रामपंचायत सफाई कर्मचाऱ्यांची ही आत्महत्या नसून हा खून असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला.दरम्यान मनसे पदाधिकारी यांनी नेरळ पोलीस ठाण्यात नेरळ ग्रामपंचायत विरोधात सदर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा म्हणून मागणी लावून धरली असून याला येथील आझाद समाज पार्टी व शिवसेना ठाकरे गटाने तसेच विविध राजकीय पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे.नेरळ सफाई कर्मचारी गणेश जाधव याने नऊ महिने पगार न मिळाल्याने आर्थिक विवंचनेतून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती.यावरून विविध राजकीय संघटना ग्रामपंचायत विरोधात रस्त्यावर उतरल्यात. नेरळ सम्राट नगर येथे राहणारा गणेश उर्फ टेंग्या जैतु जाधव या नेरळ ग्रामपंचायत सफाई कर्मचाऱ्याने शनिवार 10 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरात कोणी नसताना लटकून आपले जीवन संपविले होते.दरम्यान एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला पगार न मिळाल्याने आत्महत्या करण्याची वेळ येत असल्याने शहरात ग्रामपंचायत सत्ताधाऱ्यांवर व प्रशासनावर नागरिकांकडून शाब्दिक चिखल फेक झाली होती.यावरून काही राजकीय पुढाऱ्यांनी कर्मचारी वर्गाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला होता.मनसेचे तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले असून नेरळ पोलीस ठाण्याला भेट दिली होती.यामध्ये विविध राजकीय पुढाऱ्यांनी देखील आपला पाठिंबा दर्शविला होता.मनसेने ग्रामपंचायत विरोधात खुनाचा गुन्ह्याची मागणी करीत मयत गणेश जाधव याच्या घरात कुणी कर्ता पुरुष नसल्याने त्याच्या पत्नीला सेवेत सामावून घेत त्यांच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची मदत करण्याची मागणी निवेदनातून केली.
आझाद समाज पार्टीचे ऍड सुमित साबळे व त्यांची टीम तर शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख हेमंत बंडू क्षिरसागर यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला होता.नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या कडे मनसेकडून ग्रामपंचायत विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून मागणी लावून धरली,तर ढवळे यांनी देखील आपण वरिष्ठ यांच्याशी चर्चा करून तपास करून गुन्हे दाखल करण्याचे अश्वासन दिले आहे.
आझाद समाज पार्टीचे ऍड सुमित साबळे यांनी येथील लोक प्रतिनिधी तर आमदार महेंद्र थोरवे यांच्या बाबत नाराजी व्यक्त केली.
आंदोलन कर्त्यांनी नेरळ पोलिया ठाणे यानंतर नेरळ ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच,उपसरपंच, सदस्य,ग्रामसेवक यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक सदस्य कोणीही हजर नसल्याने येथील खुर्चीला हार घालून निषेध नोंदवण्यात आला.
एकूणच ज्या ग्रामपंचायतच्या भोंगल कारभारामुळे एक कुटूंब,त्या घरातील त्याची लहान मुले उघड्यावर आली आहेत असेच चाळीस हून अधिक कुटुंब आहेत कि ते नेरळ ग्रामपंचायत मध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करतात,त्यांच्या घरात 9 महिने पगार दिलेला नाही, अशा संकटात तेही घर चालवत आहे त्यामुळे या कुटुंबाचा संसार रस्त्यावर येण्यापासून ग्रामपंचायत प्रशासन रोखणार का की असे किती गणेश जाधव सारखे बळी घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.