पुणे- सध्या जग विविध मार्गांवर अडखळते आहे, थांबले आहे. त्याला आपल्या परंपरेकडून आलेल्या ज्ञानाची गरज आहे. तो मार्ग आपण ज्ञान, भक्ती आणि कर्म यांच्या त्रिवेणी संगमातून दाखवू शकतो. ती दृष्टी देण्याचे काम डॉ. देगलूरकर यांच्या ग्रंथाच्या माध्यमातून झाले आहे’, अथातो बिंब जिज्ञासा’ विवेकभान जागवणारा ग्रंथ आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी केले.
मंदिर स्थापत्य आणि मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर संशोधित आणि लिखित ‘अथातो बिंब जिज्ञासा’ या मराठी ग्रंथाचे प्रकाशन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. हा ग्रंथ स्नेहल प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आला असून आशुतोष बापट यांनी त्याचा मराठी अनुवाद केला आहे. बालशिक्षण संस्थेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर डॉ. गो. बं. देगलूरकर, अनुवादक डॉ. आशुतोष बापट आणि स्नेहल प्रकाशनाचे संचालक रवींद्र घाटपांडे उपस्थित होते.
‘डॉ. देगलूरकर हे आधुनिक युगातील ऋषीपरंपरेचे पाईक आहेत असे सांगून डॉ. भागवत पुढे म्हणाले, आपल्याकडे मूर्तिपूजा आहे ती आकारातून निराकाराशी संधान बांधणारी आहे. प्रत्येक मूर्ती घडविण्यामागे शास्त्र आहे. मूर्ती भावयुक्त आहे. तो केवळ बुद्धीचा विलास नाही. त्यामागे अनुभूती आहे. मात्र त्यासाठी दृष्टी हवी. कारण दृष्टीनुसार दृष्य दिसते, याचा अनुभव आपण सर्वजण घेत असतो. दृष्टी घडविण्यासाठी श्रद्धा हवी. ती डोळस हवी. भौतिकवादी नजरेला दृष्टी नसते. त्यामुळे दृष्टी परिश्रमाने, अभ्यासाने मिळवावी लागते. डॉ. देगलूरकरांचा ग्रंथ राष्ट्रजीवनाकडे, ज्ञानपरंपरेकडे पाहण्यासाठी सकारात्मक दृष्टी देणारा, विवेकभान जागवणारा ग्रंथ आहे. ज्ञान आणि कर्म हे दोन पंख त्यासाठी भक्तीमार्गाकडे नेण्यास उपयुक्त ठरतील असेही डॉ. भागवत यावेळी म्हणाले.
अनुवादक डॉ. आशुतोष बापट म्हणाले,देगलूरकर सर मुर्तीशास्त्राचा चालता बोलता ज्ञानकोष आहेत. देगलूरकर सर आणि मूर्तीशास्त्र हे अद्वैत आहे, इतके ते मूर्तीशास्त्राशी तादात्म्य पावलेले आहेत. त्यांच्या सहवासात आणि मार्गदर्शनाखाली काम करताना आपल्या अज्ञानाची क्षितिजे रुंदावल्याचा अनुभव घेतला आणि समृद्ध होत गेलो.