
रत्नागिरी : जिल्ह्यात अनधिकृतपणे वास्तव्याला असणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. या बांगलादेशी नागरिकांना जिल्ह्यात घेऊन येणाऱ्या दलालांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथकेही तयार केली आहेत.
नाखरे येथील चिरेखाणीवर काम करणाऱ्या १३ बांगलादेशींना काही दिवसांपूर्वी पोलिसांनी पकडले होते. त्यानंतर पोलिस दल व सुरक्षा यंत्रणेने एकत्रित काम करुन तालुक्यात व जिल्ह्यात ठिकठिकाणी सर्च ऑपरेशन राबवण्यास सुरुवात केली आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीने एका बांगलादेशी नागरिकाला बनावट जन्मदाखला दिल्याचा प्रकार पुढे आला होता. या प्रकरणी ग्रामसेवक आणि तत्कालीन सरपंच व सदस्यांची मुंबईतील एटीएसकडून चौकशी करण्यात आली.
या घटनांनंतर रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथून एका बांगलादेशी महिलेला दहशतवादविरोधी पथक आणि पोलिसांनी ताब्यात घेतले. या महिलेचे सावर्डे येथील एका तरुणाशी लग्न झाले असून, ही महिला नाव बदलून रत्नागिरीत राहत होती. या महिलेने आधार कार्ड, पॅन कार्ड व रेशन कार्ड रत्नागिरीच्या पत्त्याचे करून घेतल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी ती आणि तिच्या पतीला ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात बांगलादेशी नागरिक कोणामार्फत दाखल होत आहेत, याचा शोध पोलिस घेत आहेत. बांगलादेशी नागरिकांना जिल्ह्यात आणून त्यांची बनावट कागदपत्रे कोण तयार करत आहेत, याचाही शोध घेतला जात आहे. हे नागरिक दलालांमार्फत दाखल होत असून, या दलालांचा शोध पोलिस घेत आहेत. त्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथक तयार केली आहेत. या पथकांच्या आधारे या दलालांचा शोध सुरू आहे.
बांगलादेशी नागरिकांना स्थानिक पातळीवर मदत करणारे लोक कोण आहेत? अशा लोकांचा कोणाशी संपर्क आहे ? त्यांनी नेमक्या किती लोकांना आश्रय दिला आहे? याची माहितीही आता कसून घेतली जाणार असल्याचे समजते.