
पालघरमधील वैतरणा स्टेशनजवळील रेल्वे तडा गेल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांसह लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला आहे.
मुंबई प्रतिनिधी- पश्चिम रेल्वे मार्गावरील पालघरमधील वैतरणा स्टेशनजवळील रेल्वे तडा गेल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली. रेल्वे प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या पालघर स्थानकात खोळंबल्या आहेत. तर, लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. सध्या रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम चालू असून चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाला आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास वैतरणा स्टेशनजवळील रेल्वे तडा गेल्याची माहिती प्राप्त झाली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पथके तैनात केली आहेत. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, या दुरुस्तीच्या कामाचा अप-लाइनवरील गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या तात्पुरत्या पालघर तसेच पर्यायी स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत. याशिवाय, लोकल गाड्यांच्या वेळापत्रकही कोडमडले आहे. लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. दुरुस्तीच्या कामामुळे प्रवाशांना निश्चित ठिकाणी पोहण्यासाठी विलंब होण्याची शक्यता आहे.