पुणे- राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मॉन्सूनने बहुतांश जिल्ह्यात हजरे लावली आहे. रविवारी मुंबईत आणि पुण्यात व विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने आजपासून पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासांत दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र व कोकणाच्या उर्वरीत भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात देखील विजांच्या कडकाडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येथील बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत पुढील काही दिवस हवामान ढगाळ राहणार आहे. तर हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आजपासून पुढील पाच दिवस कोकण आणि विदर्भात बहुतांश तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच तर मराठवाड्यात आज व २७ जूनला बऱ्याच आणि २४ ते २६ जूनला काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक २३ जून ते २७ जूनपर्यंत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जिल्ह्यात तर सातारा व कोल्हापूरच्या घाट विभागात २४ ते २७ दरम्यान, रायगड जिल्ह्यात तर पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात २६ व २७ जूनला काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात पुढील पाच दिवस मेघ गर्जना, विजांचा कडकडाट ३० ते ४० किमी वेगाने वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बहुतांश भागात तर २५ जूनला पालघर, ठाणे, पुणे, नाशिक, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांमध्ये ४० ते ५० किमी वेगाने वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.