रत्नागिरी, दि. 15 (जिमाका) : काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील खेड ते दिवाण खवटी दरम्यान दरड कोसळल्याने यामार्गावरुन धावणाऱ्या अनेक रेल्वे चिपळूण, राजापूर, रत्नागिरी रेल्वे स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. हे वृत्त समजताच पालकमंत्री उदय सामंत दौऱ्यातूनच रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर दाखल झाले आणि त्यांनी प्रवाशांच्या जेवणाची, त्यांच्या लहान मुलांसाठी दुधाची व्यवस्था केली. प्रवाशांसाठी त्यांना सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पालकमंत्री स्वत: रात्री उशीरापर्यंत थांबून होते.
पालकमंत्री श्री. सामंत यांनी जिल्हा प्रशासन आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करुन प्रवाशांसाठी सुविधा करण्याची सूचना केली. प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे, पोलीस विभागाचे अधिकारी यांनी तात्काळ 2200 लोकांची जेवणाची व्यवस्था, लहान मुलांच्या दुधाची व्यवस्था, पाणी, आरोग्य व्यवस्था केली. त्याचबरोबर आज सकाळी 2000 प्रवाशांना चहा/नाष्टा देण्यात आला. लहान मुलांना दूध/बिस्कीट देण्यात आले.
पालकमंत्री श्री. सामंत यांनी या प्रवाशांना एसटी बसमधून त्यांच्या पुढील प्रवासाची सोय करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्रशासनाने रत्नागिरी येथून 40, चिपळूण येथून 16 तर खेड येथून 15 आणि मत्स्यगंधा एक्सप्रेससाठी रत्नागिरी ते पनवेल या मार्गावर 25 एसटी बसेची सुविधा देऊन प्रवाशांना रवानगी केली.