
मुंबई- तुमच्याजवळ जिद्द, कष्ट घेण्याची तयारी आणि हिंमत असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते, याचा प्रत्यय डोंबिवलीतून समोर आला आहे. डोंबिवलीत एका भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा सीए झाला आहे. आपण सीए झाल्याची गोड बातमी घेऊन मुलगा आई भाजी विकत असलेल्या ठिकाणी पोहोचला. सीए झाल्याची बातमी मुलाच्या तोंडून ऐकताच आईचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या आनंदाच्या भरात आईने मुलाला मारलेली मिठी, आणि त्या माऊलीच्या डोळ्यातून निघालेले आनंदाश्रू पाहून अनेकांचा ऊर अभिमानाने भरुन आला आहे. माय-लेकाच्या या भेटीचा क्षण गरीबांच्या मुलांसाठी प्रेरणादायी आहे.
योगेश ठोंबरे हा डोंबिवली जवळील खोनी गावामध्ये राहतो. योगेशची आई निरा ठोंबरे या डोंबिवलीतील गांधीनगर परिसरात भाजी विकण्याचा व्यवसाय करतात. गेल्या 22 ते 25 वर्षांपासून त्या याच ठिकाणी भाजी विकत आहेत. विशेष म्हणजे हा भाजीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी दोनशे रुपये उसने घेऊन त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. मात्र, मुलाने मोठं शिक्षण घेऊन आज त्यांच्या कष्टाचं चीज केलं. आपला योगेश सीएची परीक्षा पास झाला हे ऐकल्यावर निरा यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.
बेताची परिस्थिती असताना सुद्धा नीरा यांनी हिमतीने घर, संसार सांभाळत लेकाला शिकवलं. पतीचे निधन झाल्यानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर आली होती. मात्र, कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी हार न मानता मुलाला शिक्षणासाठी सर्वोतोपरी बळ दिलं. पतीचे निधन झाल्यावर घरातील नातेवाईकांनी घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी जिद्द सोडली नाही. पदरी दोन मुलं आणि एक मुलगी या सर्वांचा सांभाळ करुन मुलांचे उत्तम भविष्य घडवण्याचा निर्धार त्यांनी केला. आपल्या तीन मुलांसह मोठ्या जिद्दीने 25 वर्षे भाजी विक्रीचा व्यवसाय करून मोठ्या मुलाचे आणि मुलीचे लग्न करून दिले. हे करूनही ठोंबरे मावशी थांबल्या नाहीत, त्यांचा लहान मुलगा असलेल्या योगेशला आज आईने मोठ्या कष्टाने सीए बनवलं आहे. भाजी मंडईमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांनी ठोंबरे मावशीचा संघर्ष जवळून पाहिल्याने मावशीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आईने घेतलेल्या कष्टाचे पांग फिटले, अशीच भावना अनेकांच्या मुखातून यावेळी बाहेर पडत आहे.