परभणी : तालुक्यातील ताडबोरगाव खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून वडील घर खर्चाला पैसे न देता दारू पिण्यात पैसे उडवत असल्याचा राग मनात धरून मुलानेच वडिलांचा खून केल्याचे तपासात उघडीस आले आहे. या प्रकरणी मानवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील ताडबोरगाव येथील सूर्यभान काजळे यांच्या शेतात २४ एप्रिलच्या रात्री दत्तात्रय भोकरे यांच्या मानेवर व डोक्यात वार करून खून करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत या प्रकरणाची पार्श्वभूमी तपासली असता मयताचा लहान मुलगा परमेश्वर दत्तात्रय भोकरे (वय २८ ) हा वडिलांसोबत आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून वाद घालत असल्याची माहिती मिळाली होती.
नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री गावाजवळील शेतात ते दारू पीत बसलेले असताना परमेश्वर हा रागाच्या भरात एका शेत आखाड्यावरील कुऱ्हाड घेऊन घटनास्थळी गेला व मानेवर व डोक्यात वार करून वडिलांचा खून केला. याची कबुली परमेश्वरने दिली आहे. या प्रकरणी मानवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.