
पुणे- पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. इंदापूर शहरातील संविधान चौकात अज्ञातांनी श्रीकांत पाटील यांची गाडी फोडली. तसेच मिरचीची पूड टाकण्यात आली. या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट झाले असून परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
तहसीलदार श्रीकांत पाटील यांची गाडी इंदापूर शहरातील संविधान चौकात आली असता अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रॉडने हल्ला केला. सोबतच हल्लेखोरांनी मिरचीची पूड देखील आणली होती. या हल्ल्यात शासकीय गाडीची नुकसान झालं असून सुदैवाने तहसिलदार यातून बचावले आहेत. या घटनेनंतर इंदापूर पोलीस अलर्ट झाले असून परिसरात नाकेबंदी करण्यात आली. मी नेहमीप्रमाणे इंदापूर प्रशासकीय भवनाकडे निघालो होतो. माझी गाडी संविधान चौकात आली तेव्हा चारचाकी गाडीतून एक हल्लेखोर उतरला आणि लोखंडी रॉडने त्याने थेट माझ्यावर हल्ला चढवला. आमच्या अंगावर मिरचीची पूड उधळली. त्यावेळी माझ्या गाडीत माझा चालक आणि मी होतो. आम्ही आमचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आणखी दोन ते तीन हल्लेखोर गाडीतून उतरून आले. त्यांनी देखील आमच्यावरती हल्ला चढवला आणि ते फरार झाले, असा थरार श्रीकांत पाटील यांनी सांगितला.