सर्वोच्च न्यायालयाची एकनाथ शिंदेंसह
त्यांच्या सर्व चाळीस आमदारांना नोटीस

Spread the love

नवी दिल्ली :- आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभाध्यक्षांच्या निकालाला आव्हान देणाऱ्या ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज पहिली सुनावणी झाली. यात न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांना नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणी पंधरा दिवसांनी होईल.
सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड, न्यायाधीश जे. बी. पारडीवाला आणि न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर आजची सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या पुढच्या सुनावणीत एकनाथ शिंदेंना सर्वोच्च न्यायालयाकडे त्यांचे म्हणणे सादर करावे लागणार आहे. या सुनावणी दरम्यान, न्यायालय एकनाथ शिंदेंची बाजू ऐकून घेईल. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात पाठवावे किंवा उच्च न्यायालयातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात घ्यावे यावर निर्णय होऊ शकेल. यासंदर्भातली पुढची सुनावणी १५ दिवसांनी होणार असली तरी न्यायालयाचे वेळापत्रक आल्यानंतरच निश्चित तारीख कळू शकेल.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी १० जानेवारीला निकाल दिला. या निकालात त्यांनी कोणत्याही बाजूच्या आमदारांना अपात्र ठरविले नसल्याने ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात तर शिंदे गटाने उच्च न्यायालयात या निकालाला आव्हान दिले आहे. दरम्यान, शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेवरुन उच्च न्यायालयाने या प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांसह ठाकरे गटाला आधीच नोटीस जारी केली आहे. तिथेही या दोन्ही बाजूंना उपस्थित राहावे लागणार आहे. उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी ८ फेब्रुवारीला होणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page