
२२ तासांच्या अथक मेहनतीतून साकारले अभिनेते नाना पाटेकर यांचे भव्य पोट्रेट रांगोळीचित्र…
बेडकीहाळच्या दसरा महोत्सवात रांगोळी प्रदर्शनाचे आकर्षण; २५ किलो रांगोळीचा वापर, हजारो कलाप्रेमींची प्रदर्शनाला भेट..
देवरूख | प्रतिनिधी- कर्नाटकातील बेडकीहाळ येथे आयोजित श्री सिद्धेश्वर दसरा महोत्सवात देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार **विलास विजय रहाटे** यांनी आपल्या अद्वितीय कलाकौशल्याची मोहोर उमटवली आहे. अवघ्या २२ तासांच्या अथक मेहनतीतून त्यांनी सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे भव्य पोट्रेट रांगोळीचित्र साकारले असून, हे चित्र महोत्सवातील प्रमुख आकर्षण ठरत आहे. त्यांच्या या कलाकृतीने कर्नाटकातील कलाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे.
आठ वर्षांपासून बेडकीहाळच्या महोत्सवात मानाचे स्थान..
श्री सिद्धेश्वर दसरा महोत्सवानिमित्त कर्तव्य फाउंडेशन, बेडकिहाळ यांच्या वतीने दरवर्षी रांगोळी स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. त्या वर्षातील गाजलेल्या व्यक्ती, चित्रपट किंवा विविध विषयांवर आधारित रांगोळ्या हे या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य आहे.
देवरूखचे रांगोळी कलाकार विलास रहाटे यांना गेल्या आठ वर्षांपासून येथे विशेष प्रदर्शनीय रांगोळी साकारण्यासाठी सन्मानाने आमंत्रित केले जात आहे. यंदाही त्यांनी नाना पाटेकर यांचे आकर्षक पोट्रेट साकारत आपल्या कलेची वेगळी छाप पाडली आहे.
२२ तासांची मेहनत; सुमारे २५ किलो रांगोळीचा वापर…
विलास रहाटे यांनी साकारलेले हे पोट्रेट ११ × १७ इंच आकाराचे असून, ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी तब्बल २२ तास मेहनत घेतली. या कलाकृतीसाठी सुमारे २५ किलो रांगोळीचा वापर करण्यात आला.
ही कलाकृती साकारताना अक्षय वहाळकर, दक्ष अलगुरे, तुषार काकडे आणि संयम केसरकर यांनी मोलाचे सहकार्य केले. कलाकाराची कल्पकता, बारकाईने केलेले काम आणि रंगांची अचूक सांगड यामुळे हे पोट्रेट प्रदर्शनात लक्षवेधी ठरत आहे.

चित्रपटांपासून रामायण-महाभारतापर्यंत कलाकृतींची मोहिनी…
यापूर्वीही विलास रहाटे यांनी *पुष्पा, छावा, नरवीर तानाजी आणि कांतारा* या चित्रपटांवर आधारित आकर्षक रांगोळ्या साकारल्या आहेत. तसेच रामायण आणि महाभारतातील महत्त्वाच्या प्रसंगांनाही त्यांनी रांगोळीच्या माध्यमातून कलात्मक रूप दिले आहे. त्यांच्या या कलाकृतींना बेडकीहाळमधील रसिकांकडून प्रतिसाद मिळत आला आहे.
हजारो कलाप्रेमींची प्रदर्शनाला भेट…
श्रीमती कुसुमावती मिर्जी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात, शमनेवाडी-बेडकीहाळ, कर्नाटक येथे हे रांगोळी प्रदर्शन सुरू आहे. प्रदर्शनाला दररोज हजारो कलाप्रेमी भेट देत असून, विविध विषयांवरील रांगोळ्यांचा आनंद घेत आहेत.
म्हैसूरचा दसरा महोत्सव कर्नाटकात प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर बेडकीहाळचा दसरा महोत्सवही रांगोळी कला आणि प्रदर्शनासाठी विशेष ओळखला जातो. या महोत्सवात देवरूखच्या विलास रहाटे यांना मिळणारे मानाचे स्थान ही कोकणच्या कलाक्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.
देवरूखच्या मातीतून फुललेली कला कर्नाटकातील रसिकांची दाद मिळवत आहे. विलास रहाटे यांच्या या कलात्मक यशामुळे देवरूखच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️
🔹️जनशक्तीचा दबाव न्यूज..
🔸️दबाव जनशक्तीचा, निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*